
देवळा ; देवळा शहरातील उपनगरांमध्ये वाढत्या चोऱ्यामुळे नागरिक भयभीत झाले असून,पोलिसांनी या भुरट्या चोरांचा बंदोबस्त करावा ,या मागणीचे निवेदन येथील स्वामी समर्थ नगर मधील रहिवाशांनी पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांना मंगळवारी (२०) रोजी दिले .

निवेदनाचा आशय असा की , देवळा कळवण रोडवरील स्वामी समर्थ नगर भागात मागील वर्षभरात १० ते १२ ठिकाणी छोट्या मोठ्या चोऱ्या झाल्या आहेत . यापैकी अद्याप एकही चोरीचा तपास लागलेला नाही . यामुळे चोरांची हिंमत वाढली आहे .नुकतीच आठ दिवसा पूर्वी वासुदेव देवरे, महेश गोसावी यांच्या घरात चोरी झाली आहे. यापूर्वी ही सात ते आठ ठिकाणी घरफोडी झाली आहे . या प्रकाराने जनता त्रस्त व धास्तावलेली असून, सदर चोरांचा बंदोबस्त करण्यात यावा , या उपनगरात रात्रीची गस्त वाढविण्यात यावी ,अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात दिला आहे .
निवेदनावर राकेश आहेर ,कौतिक पवार ,प्रमोद मेधने ,रोहीत शिरसाठ, राजेंद्र आहेर, शिवाजी आहेर, श्रावण आहेर, पी बी देवरे, मुकंद पाटील ,सुनील जाधव ,नंदू जाधव ,विशाखा पवार, सुनीता जाधव ,सोनाली आहेर, मनीषा पवार , कामिनी शेळके ,कल्पना आहिरे , हितेश पगार , मनीषा देवरे आदी रहिवाशांच्या सह्या आहेत .
दरम्यान , देवळा शहरात गेल्या आठ दिवसांपासून दोन ते तीन ठिकाणी घरफोडीसारख्या घटना घडल्या असून, याची आमदार डॉ राहुल आहेर यांनी दखल घेतली असून, या घटना तात्काळ थांबविण्यासाठी पोलिस खात्याला आदेश दिले आहेत . यानंतर पोलीस यंत्रणा ऍक्शन मोडमध्ये आली असून, उपनगरात गस्त वाढवली असून, कारण नसताना बाहेर फिरणाऱ्या अनोळखी व्यक्तींना त्यांनी आपली खाकी दाखविण्याची सुरुवात केली आहे .
अलीकडे देवळा शहर व देवळा तालुक्यातील ग्रामीण भागात चोरी/घरफोडी सारखे प्रकार घडले आहेत. जनतेच्या जीविताचे व मालमत्तेचे संरक्षण करणे हे पोलीसांचे आद्य कर्तव्य आहे. आम्ही आमच्या वतीने अशा घटनांना प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करीत आहोत. नागरिकांनी देखील जागरूक राहणे आवशयक आहे. भंगार जमा करण्यासाठी , भिक्षा मागण्यासाठी ,काही साधू व महिला अनाथ आश्रमाच्या मदतीसाठी , तसेच खुर्च्या, चटई, भांडी विकण्यासाठी, ब्लॅंकेट,महिलांचे कपडे विकण्यासाठी असे निरनिराळ्या कारणासाठी लोक शहरात व ग्रामीण भागात दारोदार फिरत असतात त्यांचे वेशात काही गुन्हेगार व चोरटे फिरून ते परिसराची तसेच बंद घरांची पहाणी करून रात्रीचे वेळेस बंद घर फोडून चोरी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी नागरिकांना आवाहन वजा सूचना करण्यात येते की ,शक्यतो आशा लोकांकडून वस्तू खरेदी करू नका. महिलांचे दागिने पॉलिश करून देण्याचे बहाण्याने देखील लुबाडणारे लोक आहेत. आशा लोकांना थारा देऊ नये. आशा लोकांविषयी काही संशय आल्यास पोलीस ठाण्यात संपर्क साधावा .कोणी नागरिक बाहेर गावी जाणार असेल तर त्याची माहिती शेजाऱ्यांना द्यावी. श्यक्य तो बाहेर गावी जाताना मौल्यवान वस्तू रोख रक्कम घरात सोडून जाऊ नये. मोटार सायकल लॉक लावून सुरक्षित ठिकाणी ठेवावी. अशा प्रकारे नागरिकांनी थोडी सतर्कता बाळगावी.
– दिलीप लांडगे ,पोलीस निरीक्षक
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम