
देवळा : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त देवळा नगरपंचायत, कोटक महिंद्रा बँक व वनविभाग देवळा यांच्या संयुक्त विद्यमाने येथील कोलती नदीपात्रात व परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच प्लास्टिक कचऱ्याचे संकलन करत वृक्षारोपण करण्यात आले.

नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक जितेंद्र आहेर,माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार, मुख्याधिकारी श्यामकांत जाधव यांच्यासह कोटक महिंद्राचे सतीश सोनवणे, वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास ढोमसे व वनविभागाचे व नगरपंचायतीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान नगरपंचायत सभागृहात झालेल्या कार्यक्रमात नगरसेवक जितेंद्र आहेर यांनी पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान देण्याचे आवाहन केले. तसेच वृक्षमित्र सुनील आहेर आणि नगरपंचायतीचे सुधाकर आहेर यांनीही मनोगते व्यक्त केली.
कोलती नदीपात्राचा किनारा हरित राहण्यासाठी वनविभागाकडून बांबूची रोपटे मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी प्लास्टिक व इतर सर्व प्रकारचे प्रदूषण हटविण्यासाठी आणि परिसराची स्वच्छता राखण्यासाठी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेण्यात आली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम