Skip to content

देवळा बस स्थानकात मुहूर्तावर पूजन करत अनोखे लक्ष्मीपूजन साजरे


देवळा : येथील देवळा बसस्थानकावर सोमवार (दि.२४) रोजी एसटी बसचे मुहूर्तावर पूजन करत अनोखे लक्ष्मीपूजन साजरे करण्यात आले. ज्या बससेवेमुळे बसस्थानकांमध्ये रोजगार निर्माण झाला आहे त्या बससेवेलाच लक्ष्मी मानत येथील व्यावसायिकांनी तसेच एसटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत बसचे औक्षण करत लक्ष्मीपूजन साजरे केले.

देवळा बसस्थानकात लक्ष्मीपुजनानिमित्त नंदुरबार-नाशिक या बसचे पूजन करताना येथील व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते दादाजी आहेर, रोहिणी आहेर, समवेत भूषण आहेर, चालक-वाहक आदी (छाया -सोमनाथ जगताप)

यावेळी देवळा बसस्थानकात आलेल्या नाशिक-नंदुरबार या बसचे पूजन येथील सप्तश्रृंगी जनरल स्टोअर्सचे संचालक व सामाजिक कार्यकर्ते दादाजी आहेर व रोहिणी आहेर या दाम्पत्याने केले. चालक अंबादास तुंगार व वाहक यादव चौधरी, वाहतूक नियंत्रक भूषण आहेर, किशोर परदेशी यांचेही पूजन करण्यात आले.

या बसस्थानकातून नाशिक, नगर, सटाणा, नंदुरबार, कळवण, सप्तश्रृंगी गड, मालेगाव, धुळे अशा अनेक बसेसची ये-जा चालू असते. यामुळे प्रवाशांची येथे नेहमीच वर्दळ असल्याने येथील लहानमोठ्या सर्वच व्यावसायिकांना छोटा-मोठा व्यवसाय करता येतो. या पार्श्वभूमीवर एसटी बसबद्दल कृतज्ञता व्यक्त करत व बससेवेलाच लक्ष्मी मानत हे लक्ष्मीपूजन करण्यात आले. एसटी बस सजवत, पूजन करून फटाके फोडत आनंद साजरा करण्यात आला. यावेळी वृक्षमित्र सुनील आहेर, जितेंद्र आव्हाड युवा मंचचे जिल्हाध्यक्ष सचिन सूर्यवंशी, आयुष आहिरे, अक्रम तांबोळी, करणं शिरसाठ, विलास आहिरे आदी कार्यकर्ते व व्यावसायिक उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!