मुंबई – देशातील सर्वोच्च तपास यंत्रणा असलेल्या एनआयएने कुविख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांवर बक्षिसे जाहीर केली आहे. एनआयएने दाऊद आणि त्याच्या इतर साथीदारांविरोधात याआधीच गुन्हे दाखल केले आहेत. त्यानंतर एनआयएने दाऊद आणि त्याच्या टोळीतील इतर साथीदाराविरोधात लाखोंची बक्षिसे जाहीर केले आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. तर, त्याचा विश्वासू सहकारी असणारा छोटा शकीलवर २० लाखांचे बक्षीस जाहीर केले. दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिम, जावेद पटेल उर्फ जावेद चिकना आणि टायगर मेमनवर प्रत्येकी १५-१५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसह इतर टोळीच्या सदस्यांवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत, तपास यंत्रणेकडून याचा तपास सुरू आहे. एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, संयुक्त राष्ट्रसंघाने दाऊद इब्राहिमला जागतिक दहशतवादी जाहीर केले आहे. त्याशिवाय भारतातही दाऊदविरोधात दहशतवाद प्रतिबंध कायद्यांतर्गत (UAPA) गुन्हा दाखल आहे. आरोपींकडून आंतरराष्ट्रीय दहशतवादी नेटवर्क चालवण्यात येत असल्याचे एनआयएने म्हटले आहे. दाऊद इब्राहिमकडून डी-कंपनी ही टोळी चालवण्यात येते. यात या सर्वांचा समावेश आहे. हे सर्व आरोपी शस्त्रांची तस्करी, नार्को टेररिझम, मनी लाँड्रिंग व दहशतवादी कृत्यांसाठी आर्थिक मदत उभारणे, आदी कृत्यांमध्ये सामील आहे.
काही महिन्यांपूर्वीच दहशतवाद्यांना आर्थिक मदत पुरवल्याप्रकरणी एनआयएने मुंबईत काही ठिकाणी छापेमारी केली होती. हे छापे दाऊद इब्राहिमशी संबंधित ठिकाणे, त्याच्या निकटवर्तीयांवर होते. या छापेमारीत काही महत्त्वाचे धागेदोरे लागले होते. त्यानंतर यंत्रणेने सलीम फ्रूटला अटक केली. सलीम फ्रूट हा छोटा शकीलचा मेव्हणा काही दिवसांपूर्वी अनिस इब्राहिमच्या मुलीच्या लग्नात तो पत्नीसह सामिल झाला होता. या लग्नात दाऊदसाठी खास सूट, तसेच अनिसच्या मुलीसाठी दागिने नेण्यात आले होते. मात्र सलीम फ्रूटने या आरोपांचा इन्कार केला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम