वैभव पगार – म्हेळुस्के | नाशिकहुन दिंडोरी मार्गे सापुताराकडे जाताना निसर्गरम्य असा ओझरखेड धरणाचा परिसर आहे. तेथून पूर्वेला श्री क्षेत्र करंजी हे देवस्थान आहे. हे ठिकाण भगवान दत्तात्रयांचे आजोळ तसेच एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. तसेच या ठिकाणी दुर्मिळ दिसणारी पद्मासन स्थित प्रभू दत्तात्रेयांची मनमोहक मुर्ती आहे. त्यामुळे या स्थानास विशेष महत्व आहे. या स्थानाबद्दल एक ऐतिहासिक आख्ख्यायिका देखील आहे.
दत्तप्रभूंच्या मातोश्री अनुसया माता यांचे वडील कर्दम ऋषी यांचा आश्रम दंडकारण्यातील सध्याचा दिंडोरी परिसर करंजी क्षेत्र येथे होता. कर्दम ऋषी व माता देवी होती. या दांपत्याच्या पोटी सती अनुसया यांचा जन्म झाला. त्यामुळे करंजी देवस्थान दत्तप्रभूंचे आजोळ म्हणून ओळखले जाते. शिवदयाळ स्वामी हे करंजी क्षेत्राचे महान तपस्वी होते. त्यांना येथील वटवृक्षाची गर्दी, आमराई असे निसर्ग वैभव पाहून प्रसन्न वाटले. म्हणून येथे ते वास्तव्यास राहू लागले. शिवदास स्वामींनी आपल्या खडतर तपाने प्रत्यक्ष गंगा माई ला येथे आणले असे म्हटले जाते. गंगा माईने स्वामींना दत्तप्रभूंची पद्मासनस्थ मूर्ती प्रसाद म्हणून दिली. महाराजांनी त्या मूर्तीची या ठिकाणी स्थापना केली. अशा प्रकारची पद्मासनस्थ दत्तात्रेयाची मूर्ती जगात कोठेही नाही असे येथील माहितीगार वृध्द सांगतात. यावरून हे देवस्थान स्वयंभू आहे असे म्हटले जाते.
Datta Jayanti | दत्तात्रेय महाराजांचा जन्म कसा झाला ?; वाचा सविस्तर
आज या ठिकाणी रोज गोसेवा, अतिथी भोजन, शेती, त्रिकाल आरती, पूजा याबरोबरच मुख्य म्हणजे येथे सर्व वैदिक कर्म व परंपरा सोवळेओवळे अत्यंत कटाक्षाने पाळले जातात. पूर्वी परिसरात हिंस्र पशूंचे पक्षांचे हे माहेरघर होते. येथे पिंपळाची वडाची विशाल झाडे होती. चाफ्याच्या फुलांचा सडा पडलेला असे आंब्याची अंबराई कर्दळीच्या बागा अशा अनेक फळा फुलांच्या झाडांची गर्दी होती. शिवाय करंजाची झाडे भरपूर प्रमाणात होती. त्यामुळे या क्षेत्राला करंजी असे म्हटले जाते. आजही येथे एका वेगळ्याच प्रकारची नैसर्गिक लावण्य लाभलेले आहे. येथे आंब्याची चिंचेची झाडे आहेत. फुलांची झाडे मन प्रसन्न करतात.
आनंदा नदीच्या झुळझुळ वाहणारे पाणी ओझरखेड धरण परिसरातील डोंगर, टेकड्या या क्षेत्राला शोभा देत आहेत. येथे दत्तजयंती व महाशिवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. आता दत्त जन्मोत्सव निमित्ताने सप्ताहाचे आयोजन केले जाते. दूरदूरून दत्त भक्त येथे दर्शनासाठी येतात. या परिसराचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी कुठल्या प्रकारचा गंडा दोरा ताई हा प्रकार नाही. येथे परिसरात दत्त मंदिराबरोबरच श्रीगणेश मंदिर, विठ्ठल – रखुमाई मंदिर, बाल खेडपती हनुमान मंदिर, महादेव मंदिर, सप्तश्रृंगी देवी मंदिर, गंगामातेचे मंदिर, इत्यादी मंदिरे आहेत. तसेच स्वामी शिवदयाळ गिरी महाराज, महंत भास्करानंद जोशी महाराज, महंत हरिगिरी महाराज, सुभाषगिरी महाराज, यांची समाधीस्थळे आहेत. आरतीच्या वेळी येथे परिसरातील कुत्रे मंदिरात येतात. भाविकांची गर्दी असून पण ते मंदिरात येतात हे विशेष. परिसरातील निसर्ग सौंदर्यामुळे येथे कायम भक्तांची रिघ लागलेली असते. येथे दत्तजयंती निमित्त मोठ्या सोहळ्याचे आयोजन केले जाते.
Datta Jayanti | दत्तात्रेय महाराजांचा जन्म कसा झाला ?; वाचा सविस्तर
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम