नाशिक : राज्य सरकारने कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. याचा फटका इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेला दरेवाडी (काळूस्ते) येथील जिल्हा परिषद शाळेला बसला असून ही शाळा गेल्या महिन्याभरापासून बंद आहे. यामुळे जवळपास ४३ विद्यार्थी शिक्षणापासून वंचित झालेले आहेत. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांनी “दप्तरे घ्या, आम्हाला बकऱ्या द्या” हे अभिनव आंदोलन केले.
इगतपुरी तालुक्यातील भाम धरणामुळे विस्थापित झालेल्या दरेवाडी या अतिदुर्गम व विस्थापित गावातील जिल्हा परिषद शाळा गेल्या महिन्यात बंद करण्यात आली होती. यांमुळे इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे ४३ विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित झाली होती. ही शाळा बंद करू नये म्हणून ऑगस्ट महिन्यात इगतपुरी पंचायत समितीत आंदोलन केले होते. यावेळी तेथील गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना लेखी स्वरुपात शाळा बंद करणार नसल्याचे आश्वासन दिले होते. पण काही दिवसांनी पुन्हा शाळा सुरु झाल्यानंतर झालेल्या पालक सभेत सदर शाळा बंद करण्याचे पत्र वाचून दाखविण्यात आले. यावेळी केंद्रप्रमुख माधव उगले यांना मारहाण झाली होती, तेव्हापासून ही शाळा बंद आहे.
त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांनी आपले शैक्षणिक नुकसान न होण्यासाठी पुन्हा आंदोलनाचा मार्ग पत्करत थेट जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर धडक दिली. यावेळी आंदोलक पालक व विद्यार्थ्यानी शेळ्या, दप्तर घेत हे अभिनव आंदोलन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारींसमोर दप्तर ठेवत आम्हाला दप्तर नको, पुन्हा शेळ्या, बकऱ्या द्या असे म्हणत आंदोलन केले.
अखेर सर्व आंदोलकांच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी अमिषा मित्तल व प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांची भेट घेत त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अधिकाऱ्यांनी सदर शाळा सुरु करण्याचे आश्वासन दिले आहेत. यावेळी गणपत गावंडा, साईनाथ गावंडा,सोमनाथ आगिवले, अरुण गावंडे, बाळू गावंडे, काळू गावंडा, लक्ष्मण गावंडे, लहू गावंडे, कृष्णां गावंडे, आनंद आगिवले, राजेंद्र मेंगाळ, गोविंद गावंडे, यशोदा गावंडे, नाथू सावंत, मथुरा भगत, एकनाथ गावंडा आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम