Nashik : नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या पळसे येथील दारणा नदी जवळील भैरवनाथ मंदिराजवळ एका २९ वर्षाच्या युवकाने आपल्या डोक्यात बंदुकीची गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संदीप नाना सहाणे (वय २९) असे गोळी झाडून आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. आज सकाळी त्याने पळसे येथील दारणा नदीजवळ असलेल्या भैरवनाथ मंदिर येथे बंदुकीच्या सहाय्याने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.
त्यानंतर सदरची घटना नातेवाईक व नागरिकांना समजताच त्यांनी नाशिकरोड पोलिसांना माहिती दिली. यानंतर घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक शेळके हे तातडीने दाखल झाले व झालेल्या घटनेची माहिती घेऊन पंचनामा केला.
दरम्यान, संदीप सहाणे याने आत्महत्या का केली याबाबतचे निश्चित कारण अद्याप समजू शकलेले नाही. तसेच कौटुंबिक वादातून त्याने आत्महत्या केली असावी अशी चर्चा परिसरात सुरू आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून त्या युवकाकडे पिस्तुल कशी आली? याचा तपास पोलीस करत आहेत. काही दिवसांपूर्वी एक इसमाला अवैधपणे शस्त्रास्त्रे बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. मात्र अशा प्रकारची जीवघेणी शस्त्रास्त्रे येतात कुठून हा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला होता. दरम्यान पोलिसांनी अवैधपणे शस्त्रांची विक्री करणाऱ्यांवर देखील कारवाई करण्याची मागणी आता केली जात आहे.
नाशिक शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून या प्रकारच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. यामुळे शहरातील वातावरण देखील दिवसागणिक ढवळून निघत असल्याचं बघायला मिळतं हत्या आत्महत्या चोरी खून दरोडा यांसारख्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने आता संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष घालून वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम