द पॉईंट नाऊ ब्युरो : उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे PUBG खेळण्यास नकार दिल्याने 16 वर्षांच्या मुलाने आईची गोळ्या घालून हत्या केली. त्यानंतर मृतदेह तीन दिवस घरात लपवून ठेवला होता. लहान बहिणीला एका खोलीत बंद केले होते. मृतदेहातून दुर्गंधी येत असताना आरोपी मुलाने हत्येची खोटी कहाणी रचून पोलिसांना माहिती दिली. अखेर चौकशीत संपूर्ण घटना उघड झाली.
ही घटना लखनऊच्या पीजीआय भागातील आहे. साधना सिंग (40 वर्षे) या अल्डिको कॉलनीत 16 वर्षांचा मुलगा आणि 10 वर्षांच्या मुलीसोबत राहत होत्या. साधना यांचे पती नोकरीनिमित्त कोलकाता येथे राहतात. ते लष्करी अधिकारी आहे. साधना यांच्या मुलाला PUBG गेम खेळण्याचे व्यसन असल्याचे सांगण्यात आले. गेम खेळण्यापासून रोखण्यावरून मायलेकात भांडण होऊ लागले.
वडिलांच्या बंदुकीने आईची हत्या
साधना यांनी आपल्या मुलास गेम खेळण्यावरुन रोखले. तेव्हा PUBG गेम खेळणे बंद केल्यावर रागाच्या भरात मुलाने वडिलांचे परवाना असलेले पिस्तूल उचलले आणि थेट आईच्या डोक्यात गोळी झाडली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपी मुलाने लहान बहिणीला धमकावून दुसऱ्या खोलीत बंद केले.
तीन दिवस आईच्या मृतदेहाजवळ बसला
तीन दिवसांपासून मुलगा घरात आईच्या मृतदेहासोबत राहत होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मृतदेहाची दुर्गंधी येत असल्याने रूम फ्रेशनर शिडकले. मात्र, दुर्गंधी वाढल्याने मुलाने वडिलांना फोन करून आईच्या हत्येची माहिती दिली. त्यानंतर वडिलांनी तत्काळ पोलिसांना फोन करून माहिती दिली.
पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
पोलिसांनी सांगितले की, मुलाकडून घटनेची माहिती घेतल्यानंतर त्याने त्यांची दिशाभूल केली आणि इलेक्ट्रीशियन घरी आला होता, त्यानेच आईची हत्या केल्याचे सांगितले. पण, अडीच तासांच्या तपासात संपूर्ण हकीकत समोर आली आणि पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम