नाशिक : राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री छगन भुजबळ यांनी काल (दि. २७) एका कार्यक्रमात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी शहर पोलिसांनी भुजबळ यांच्या सिडकोतील भुजबळ फार्म निवासस्थानाबाहेर पोलिस बंदोबस्तात वाढ केली आहे.
काल मंगळवारी मुंबई येथे भुजबळ यांनी शाळांमध्ये महापुरुषांच्या फोटोऐवजी देवी सरस्वती व शारदेचे फोटो लावण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित करीत हे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे राज्यात अनेकांकडून संताप व्यक्त करत त्यांचा निषेध केला जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर सिडको परीसरातील भुजबळ फार्म येथील पोलिस बंदोबस्तात वाढ करत तेथील पेट्रोलिंगही वाढवण्यात आली आहे. तसेच, अंबड पोलिस ठाण्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडूनही याबाबत सतर्कता बाळगली जात असल्याचे अंबडचे पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी सांगितले आहे.
नेमके काय म्हणाले होते भुजबळ ?
काल मुंबई येथील एका कार्यक्रमात भुजबळ यांनी शाळांमध्ये महापुरुषांचे फोटो लावण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित करत म्हणाले, “शाळांमध्ये फुले, आंबेडकर, शाहू, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे फोटो लावले पाहिजेत, कारण त्यांनी शिक्षणाचा अधिकार दिला. परंतु सरस्वतीचा फोटो, शारदा मातेचा फोटो लावतात. जिला आम्ही कधी पाहिले नाही. जिने आम्हाला काही शिकवले नाही. असेलच शिकवले तर फक्त तीन टक्के लोकांना शिकवले आणि आम्हाला दूर ठेवले, तर त्यांची पूजा कशासाठी करायची ?, असे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.
त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप व अनेक संघटनेकडून विविध ठिकाणी त्यांचा निषेध नोंदवला जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारी म्हणून येथील पोलीस बंदोबस्तात वाढ केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम