लाचखोरांना दणका; नऊ हजारांपेक्षा जास्त भ्रष्ट लोकसेवकांवर कारवाई

0
30

द पॉईंट नाऊ: लाचखोरीच्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात रंगेहात सापडलेल्या भ्रष्ट लोकसेवकांना सुरुवातीला पोलीस कोठडी, तर नंतर न्यायालयीन कोठडी दिली जाते. यानंतर त्यांना जामीन होतो. संबंधित शासकीय खातेप्रमुखांकडून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करून घरी पाठविले जाते. मात्र, लाचखोरीच्या गुन्ह्यात शिक्षा झाल्याचे खटले फार कमी निकाली निघतात. यामुळे लाचखोरीला अद्यापही आळा बसताना दिसत नाही. शिक्षा होण्याचे प्रमाण कमी असल्याचे यामध्ये दिसून येते.

आपल्या पदाचा व अधिकारांचा गैरफायदा घेत शासकीय लोकसेवक असलेले काही भ्रष्ट नीतीचे अधिकारी, कर्मचारी सर्वसामान्यांचे कामे अडवून ठेवतात. टेबलाखालून काही आपल्या पदरात पाडता येईल का? हा त्यांचा यामागील हेतू असतो. लाचेची मागणी करून ज्या शासकीय आस्थापनांमध्ये नोकरी करतात तेथेच संबंधितांना बोलावून त्यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारतानाही बहुतांश अधिकारी, कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकतात. संबंधित संशयित लाचखोरांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केला जातो व त्यांना अटकही होते. मात्र,तरही लाचखोरीचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. दरवर्षी काही ठराविक शासकीय खात्यांमध्ये भ्रष्टाचार फोफावतच चालला आहे. यामध्ये पोलीस, महसूल, जिल्हा परिषद, आदिवासी विकास हे शासकीय खाते यावर्षीही आघाडीवर असल्याचे दिसून येते.

नऊ हजारांपेक्षा जास्त भ्रष्ट लोकसेवकांवर कारवाई

१ जानेवारी २०१५ ते ११ जुलै २०२२ पर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्यात तब्बल ८ हजार ८५३ पेक्षा जास्त भ्रष्ट लोकसेवकांविरुद्ध कारवाई केली आहे.यामध्ये लाच स्वीकारणे, लाचेची मागणी करणे, अपसंपदा जमविण्याचा समावेश आहे. यासाठी शासकीय सेवक व त्यांच्या विश्वासातील खासगी व्यक्तींनाही लाच घेण्यास किंवा मागणी करण्यास सांगितल्याचे समोर आले आहे.

सुमारे ३० जणांना अटक

लाचखोरीच्या गुन्ह्यांमध्ये यावर्षी आतापर्यंत नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुमारे ३० पेक्षा जास्त संशयित भ्रष्ट लोकसेवकांना अटक करण्यात आली आहे.त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हेदेखील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आले आहेत. त्यांना शासकीय सेवेतूनदेखील निलंबित करण्यात आले आहे.

मोबाइल ते लॅण्डलाइन करा संपर्क

लाचलुचपत प्रतिबंधक विभागासोबत संपर्क करण्यासाठी लॅण्डलाइन ते लॅण्डलाइन व मोबाइल ते लॅण्डलाइनवर संपर्क करण्याची मुभा आहे. तसेच टोल-फ्री १०६४ देखील राज्यस्तरीय हेल्पलाइन कार्यान्वित आहे. त्याचप्रमाणे आपण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परिक्षेत्रातील पुढील जिल्हानिहाय युनिटच्या कार्यालयातसुद्धा थेट संपर्क साधून शकता. नाशिक ०२५३-२५७५६२८, अहमदनगर- ०२४१ २४२३६७७, धुळे – ०२५६२-२३४०२०, नंदुरबार- ०२५६४ २३०००९, जळगाव- ०२५७ २२३५४७७


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here