नाशिक : जिल्ह्यासह राज्यात गाजलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणातील फरार संशयित डॉ. स्वप्नील सैंदाणे यांना नाशिक तालुका पोलिसांनी नंदुरबारमधील अक्कलकुवा येथून अटक केली आहे.
जेव्हा ग्रामीण पोलिसांनी हे प्रकरण उघडकीस आणले होते, तेव्हा ह्यात सामील असलेल्या अनेकांचे धाबे दणाणले होते. आतापर्यंत या प्रकरणात ग्रामीण मुख्यालयातील वरिष्ठ लिपिकासह जिल्हा रुग्णालयातील लिफ्टमनला अटक करण्यात आली आहे. तसेच जिल्हा रुग्णालयाचे तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीवास व डॉ. निखिल सैंदाणे, डॉ. स्वप्नील सैंदाणे व अनेक डॉक्टरांचा आणि कर्मचाऱ्यांचा ह्यात समावेश आहे. या सर्वांवर नाशिक तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच ह्यात अनेक पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पण यातील तीन संशयित डॉक्टर गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहेत. दरम्यान, याचा तपास करणाऱ्या तालुका पोलिसांना डॉ. सैंदाणे नंदुरबार जिल्ह्यात असल्याचे समजताच पथकाने त्यांना मंगळवारी (ता. २७) अक्कलकुवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेतले. त्यांना बुधवारी (ता.२८) जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. विशेष म्हणजे, डॉ. सैंदाणे यांच्याकडे सर्जन पदवी नसताना एमडी सर्जन असल्याचे भासवून पोलिस कर्मचाऱ्यांच्या आजारपणाच्या अहवालावर शिक्के दिले होते.
दरम्यान, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीवास व डॉ. निखिल सैंदाणे यांचा नुकताच अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयात फेटाळण्यात आला होता. तसेच, याप्रकरणी बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवरही अटकेची टांगती तलवार कायम असून त्यासंदर्भात लवकरच तालुका पोलिसांकडून कारवाई होण्याची दाट शक्यता मानली जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम