बीड : येथील भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी आज आपल्या डोक्यावर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यात त्यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
भगीरथ बियाणी यांनी बीडपासून सुमारे २५ किमी लांब असलेल्या त्यांच्या एमआयडीसी परिसरातील घरामध्ये सकाळच्या सुमारास आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्यांच्या एमआयडीसी येथील घरी पिस्तुल सापडली असून त्यामधून गोळी झाडल्याचे स्पष्ट आहे, अशी माहिती बीडचे पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांनी दिली आहे. दरम्यान, त्यांच्या आत्महत्येची माहिती त्यांच्या कुटुंबियांना मिळताच त्यांनी त्वरित बियाणी यांना शहरातील फिनिक्स रुग्णालयात दाखल केले. पण त्यापूर्वी त्यांचे निधन झाल्याचे स्थानिक डॉक्टरांनी सांगितले आहे.
दरम्यान, बियाणी यांच्या आत्महत्येमुळे त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून ते सध्या कोणतीही प्रतिक्रिया देण्याच्या मानसिकतेमध्ये नाही. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.
भगीरथ बियाणी हे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे व खासदार प्रीतम मुंडे यांचे निकटवर्ती होते. गेल्या अनेक वर्षापासून ते भाजपमध्ये सक्रिय कार्यकर्ते म्हणून काम करायचे. तसेच, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत त्यांनी अनेक वर्षे काम केले आहे. सध्या त्यांच्याकडे बीडच्या भाजपच्या शहराध्यक्ष पदाची जबाबदारी होती.
खासदार मुंडे यांना आली भोवळ; प्रकृती स्थिर
दरम्यान, भगीरथ बियाणी यांच्या निधनाने खासदार प्रीतम मुंडे यांना धक्का बसला. त्यांना याची माहिती मिळताच त्वरित त्या रुग्णालयात गेल्या. पण, तिथे बियाणींचा मृतदेह पाहिल्यावर प्रीतम मुंडेंना भोवळ आली. तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांकडून तातडीने मुंडेंची तपासणी करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून एक जवळची व्यक्ती आपल्याला सोडून गेल्याने खासदार मुंडे या भावूक झाल्या होत्या.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम