पालकांनो, आपल्या लेकरांना सांभाळा ; शहरात चिमुकल्याचा हौदात बुडून मृत्यू

0
17

नाशिक : पालकहो, तुमच्या घरात लहान मुल आहे, तर वेळीच त्यांच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कारण शहरात गेल्या काही दिवसांपासून लहान मुलांबाबतीत अश्या अनुचित घटना घडत असताना आणखी एक हृदयद्रावक घटना घडली आहे.

शहरातील भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. आगरटाकळी भागात दोन वर्षीय मुलाचा आपल्याच घराच्या शेजारी असलेल्या पाण्याचा हौदात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. आगरटाकळीतील काठेमळा येथे सोमवारी सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. ह्या दुर्दैवी मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

शहरातील आगरटाकळी परिसरात पंचकृष्ण बंगला येथे रमेश चव्हाण हे पत्नी आणि दाेन वर्षांचा मुलगा यांच्यासोबत राहतात. सायंकाळी हा चिमुकला आपल्या घराबाहेर खेळत असताना जवळच असलेल्या सिमेंटच्या हौदाजवळ आला. कुतूहलापोटी तो हौदावर चढत असताना त्याचा ताेल घसरून हाैदातील पाण्यात पडला. दरम्यान, त्याच्या आईने बराच वेळ होऊन मुलगा दिसत नसल्याने त्याचा शोध घेतला. तेव्हा हौदाच्याजवळ जाऊन पाहिले असता तो पाण्यात पडलेला दिसला.

यावेळी त्या चिमुकल्याच्या आईने नाकातोंडात पाणी गेलेल्या स्थितीत त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील डाॅ. तडवी यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. यावेळी चिमुकल्याच्या आईसह नातेवाइकांनी एकच हंबरडा फाेडला. घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दत्ता पवार यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दरम्यान, त्याच्या अकस्मात मृत्यूची नोंद भद्रकाली पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी नाशिकरोडमध्ये एका ९ महिन्यांच्या बाळाने नेलकटर गिळल्याची घटना ताजी असतानाच आता एका दोन वर्षाच्या चिमुकल्याचा हृदयद्रावक मृत्यू व यांसारख्या अनुचित घटना वारंवार घडत असल्याने पालकांनी आपल्या मुलांकडे वेळीच लक्ष देणे, आता गरजेचे बनले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here