Skip to content

रॉजर बिन्नींना अध्यक्षपद ते महिला आयपीएल; बीसीसीआयच्या वार्षिक सभेची सर्व घडामोड वाचा एका क्लिकवर !


द पॉईंट नाऊ 

मुंबई : मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात काल (दि. १८) मंगळवारी बीसीसीआयची ९१वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यात रॉजर बिन्नी यांना अध्यक्षपदी निवड करण्यापासून ते महिला आयपीएलच्या अनेक घडामोडी झाल्या.

रॉजर बिन्नी बनले बीसीसीआयचे नवे अध्यक्ष

१९८३ विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील शिलेदारांपैकी एक व माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. ते या मंडळाचे ३६वे अध्यक्ष बनले आहेत. तसेच ते याआधी भारतीय वरिष्ठ संघाचे मुख्य निवडकर्ते देखील राहिले आहेत. त्यांनी मावळते अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याकडून पदाची सूत्रे हाती घेतले आहे. याआधीच बिन्नी यांचे अध्यक्षपदासाठी नाव निश्चित होते. केवळ औपचारिकता म्हणून  काल बीसीसीआय अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली होती.

रॉजर बिन्नी यांनी १९७९ ते १९८७ या काळात २७ कसोटी व ७२ वनडे सामन्यांत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. ते अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जायचे. बिन्नी यांनी कसोटीमध्ये ८३० धावा, वनडेमध्ये ६२९ धावा केल्या आहेत. तसेच कसोटीमध्ये ४७ विकेट्स, वनडेमध्ये ७७ विकेट्स मिळवल्या आहेत. १९८३च्या विश्वचषक विजेत्या संघाचा रॉजर बिन्नी शिलेदारांपैकी एक होते. त्यांनी या विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या.

नवी कार्यकारिणी जाहीर; आशिष शेलार यांची कोषाध्यक्षपदी निवड

दरम्यान, या वार्षिक सभेत नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. त्यात रॉजर बिन्नी यांची अध्यक्षपदी निवड झाली. तर राजीव शुक्ला हे उपाध्यक्षपदी, तर जय शाह हे सचिवपदी कायम राहिले आहेत. तर मुंबईतील भाजप नेते आशिष शेलार यांची बीसीसीआयच्या कोषाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.

नवी कार्यकारिणी खालीलप्रमाणे :

अध्यक्ष – रॉजर बिन्नी
उपाध्यक्ष – राजीव शुक्ला
सचिव – जय शहा
सहसचिव – देवजित सैकिया
खजिनदार – आशिष शेलार

एमकेजे मजुमदार हे बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेतील जनरल बॉडीचा भाग असतील. तर अरुण धुमाळ व अविषेक दालमिया यांची आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या सदस्यपदी निवड झाली आहे.

महिला आयपीएलला सभेकडून मान्यता; पुढील वर्षी रंगणार स्पर्धा

दरम्यान, कालच्या वार्षिक सभेत ५ संघांचा समावेश असलेली महिला आयपीएल स्पर्धा भरवण्यास बीसीसीआयने मान्यता दिली आहे. आता २०२३ पासून महिला आयपीएल भरवण्यात येणार आहे. यात ५ संघांचा समावेश असून यातील सामने मर्यादित ठिकाणी खेळवली जाणार आहेत.

याबद्दलची अधिक माहिती आपण या बातमीत वाचू शकता : पाच संघांच्या सहभागाने होणार महिला आयपीएल


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!