इगतपुरीच्या पूर्व भागात ढगफुटी म्हैसवळण घाट खचला; पुन्हा अतिवृष्टी झालीच तर माळीण सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते

0
47

राम शिंदे
सर्वतीर्थ टाकेद प्रतिनिधी : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेद परिसरात जोरदार अतिवृष्टी झाली या ढगफुटी सदृश्य पावसामुळे या परिसरातील अडसरे बु फळविर वाडीतील पाझर तलाव रात्री अकरा वाजेच्या सुमारास फुटला यामुळे या परिसरात सर्वत्र महापुराचे साम्राज्य पसरले होते.

या घटनेत या भागातील म्हैसवळण घाट पूर्णपणे खचला असून अनेक ठिकाणी मोठ मोठया दरड कोसळल्या तर अनेक ठिकाणी महत्वाची रस्ते पूल पूर्णपणे पाण्याखाली गेले. या तलावाच्या फुटीमुळे या भागातील शेतकऱ्यांच्या भात पिकांसह लागवड केलेल्या जमिनी पूर्ण पणे वाहून गेल्या अनेकांची शेतीची बांध फुटली या घटनेत या भागातील शेतकऱ्यांचे न भरून येणारे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान या घटनेची माहिती तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना कळताच त्यांनी घटनास्थळी मदत कार्य चालू केले.अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी पोहचविण्यात आले तसेच यासोबतच घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे,माजी सरपंच संतोष साबळे यांच्यासह तलाठी सचिन कराते, मित्र परिवाराने धाव घेत अतिपावसात रात्रीच्या सुमारास मदत कार्य चालू ठेवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी या भागातील टाकेद लेंडीनाला परिसरात पुराचे साम्राज्य पसरल्याने येथील व्यवसायिक शुभम लोखंडे यांच्यासह अन्य दुकानदारांचे दुकाने या पुरात वाहून गेले यासोबतच त्यांचे देखील लाखो रुपयांचे नुकसान झाले. तसेच टाकेद-म्हैसवळण घाट नवीन बांधकाम केलेल्या करंजी पुलावर देखील पुराचा वेढा होता यामध्ये कमलाकर बांबळे यांच्या शेताचे बांध पूर्णपणे फुटून जमीन उध्वस्त झाली.तसेच अडसरे-ते टाकेद तीर्थ रस्ता देखील पाण्याखाली गेला होता यासोबतच प्रचंड अतिवृष्टीमुळे अडसरे ते भंडारदरा वाडी रस्ता पूर्णपणे पुरात वाहून गेला रात्री उशिरापर्यंत परिसरातील सर्वच ग्रामस्थ नागरिक बचाव कार्य करत होते. पहाटेपर्यंत सर्वत्र पुराचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात होते. इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी पोलीस प्रशासनासह सामाजिक कार्यकर्ते मित्र परिवार या घटनास्थळी तात्काळ दाखल केल्याने सुदैवाने जीवित हानी टळली.

घटनास्थळी माजी सरपंच संतोष साबळे,सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे, सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, शिवा तातळे, किसन साबळे,भरत साबळे,किरण साबळे,गोटू तातळे, हिरामण कुंदे,दत्तू आंबेकर,नामदेव साबळे,सागर साबळे,प्रथमेश मुंडे,पिंटू दुर्गुडे,राम रोंगटे, धोंडू कातोरे,एकनाथ कुंदे,पोलीस पाटील प्रवीण साबळे आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ नागरिक या मदत कार्यात सामील होते.

या ढगफुटीत झालेल्या नुसानीची तात्काळ पंचनामे करून अति नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांसह नुकसान झालेल्या सर्वांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी या परिसरातील शेतकरी नितीन गोडे,दिलीप बांबळे,शिवा तातळे,माजी सरपंच संतोष साबळे आदींसह शेतकऱ्यांनी केली आहे.

सोनोशी येथील गोडेवाडी परिसरात ढगफुटीमुळे डोंगराचा भराव पूर्णपणे खचल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. बारशिगवे, सोनोशी, गोडेवाडी, धानोशी, मायदरा, चौरेवाडी, टाकेद, अडसरे बु,फळविर वाडी, वंदेवाडी, करंजवाडी, भरवीर भंडारदरा वाडी परिसरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून या दुर्घटनेत शेतकरी पूर्णतः उध्वस्त झाला आहे.

गुरुवार ता.०२ नाशिकचे खासदार हेमंत आप्पा गोडसे, माजी आमदार राजाभाऊ वाजे ,आमदार माणिकराव कोकाटे यांनी या घटनास्थळी भेट देत शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले. तसेच खासदार हेमंत गोडसे, आमदार माणिकराव कोकाटे यांनी स्थानिक प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे सूचना केल्या आहेत.

या आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या :
ढगफुटीत फळविर वाडीतील तलाव फुटल्याने एकाकीच तलावातील सर्व पाण्याचा लोट कडवा धरणाच्या दिशेने निघाला यात चार पाच की मी अंतरापर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमीनी रस्ते भात पिकांसह वाहून गेल्या अनेकांची बांध फुटली त्यामुळे प्रशासनाने तात्काळ नुकसानभरपाई द्यावी. फुटलेला पाझर तलाव नव्याने सांडवा काढून मंजूर करून बांधण्यात यावा.जे ने करून उन्हाळ्यात सर्व परिसर या तलावावर शेतीसह पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहे त्यांची गैरसोय होणार नाही. म्हैसवळण घाट रस्ता पूर्णपणे खचल्याने सदर घाट रस्ता नव्याने मजबूत दुरुस्ती करावा जे ने करून माळीण सारखी परिस्थिती निर्माण होणार नाही.

अनेक ठिकाणी मुख्य रस्ते पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने तेथील रस्ते तात्काळ मंजूर करून पूर्ण करण्यात यावे व अनेक शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन भात पिकांची लागवड केली होती त्यांनी शेती पूर्णपणे नेस्तनाबूत झाल्याने त्यांची पाहणी करून त्यांना नुकसानभरपाई द्यावी.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here