अखेर अंधेरी पूर्वमध्ये रंगणार लटके वि. पटेल लढत !

0
25

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्याविरोधात कोण उतरणार, याचा सस्पेन्स अखेर संपला. भाजपच्या वतीने मुरजी पटेल हे निवडणुकीत उतरणार आहे. त्यामुळे ठाकरे वि. शिंदे गट ही थेट लढत सध्या टळली आहे.

अंधेरी पूर्वची जागा शिवसेनेकडे असल्याने या जागेवर शिंदे गटाकडून दावा केला जात होता. त्यामुळे मुरजी पटेल हे नेमके कुणाच्या चिन्हावर निवडणूक लढणार याबद्दल अनिश्चितता होती. मात्र काल रात्री वर्षा निवासस्थानी भाजप नेते आशिष शेलार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली. त्यामध्ये भाजपला ही जागा सोडण्यावर दोन्ही बाजूने एकमत झाले. त्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मुरजी पटेल यांना फोन करून ‘कमळ’ या चिन्हावर निवडणूक लढवण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे या मतदारसंघात ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके (मशाल) विरुद्ध भाजपचे मुरजी पटेल (कमळ) असा सामना रंगणार आहे.

अंधेरी पूर्व मतदारसंघात मुरजी पटेल हे गेल्या अनेक वर्षांपासून लढत आहेत. तसेच या जागेवर भाजपची मोठी ताकद असल्याने या जागेसाठी भाजप आग्रही होता. मात्र, शिंदे गटाच्या दाव्यामुळे मुरजी पटेल यांनी शिंदे गटाकडून निवडणूक लढवावी, असा एक मतप्रवाह निर्माण झाला होता. पण कालच्या बैठकीनंतर झालेल्या निर्णयानुसार अखेर पटेल हे भाजपच्या तिकिटावर लढणार आहेत. त्यानुसार ते आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.

२०१९ मध्ये विधानसभेची जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्यावर मुरजी पटेल यांनी अपक्ष निवडणूक लढवली. त्यावेळी रमेश लटके यांनी मुरजी पटेल यांचा १६ हजार ९६५ मतांनी पराभव केला होता. पण त्यानंतर २०२० मध्ये मुरजी पटेल यांची मुंबई भाजपच्या उत्तर पश्चिम महामंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली होती.

दुसरीकडे शिवसेना ठाकरेंच्या गटाकडून ऋतुजा रमेश लटके यांना उमेदवारी दिली असून आज त्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी त्यांनी महापालिकेतील सेवेचा राजीनामा दिला होता, पण मुंबई मनपाने त्यांचा राजीनामा स्वीकारला नव्हता. त्यामुळे त्यांनी महापालिकेविरोधात त्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. त्यावेळेस हायकोर्टाने लटके यांच्या बाजूने निकाल लावत मुंबई महापालिकेला आज सकाळी ११ वाजेपर्यंत त्यांचा राजीनामा स्वीकारण्याचे सांगितले आहे. त्यामुळे ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here