जैवविविधतेची खाण असलेल्या अंजनेरीवर आढळली दुर्मिळ वनस्पती..

0
27

द पॉईंट नाऊ: जैवविविधतेची खाण मानली जाणाऱ्या अंजनेरी पर्वतरांगेत ‘फ्लेमिंगिया रोलाई ‘ ही अतिदुर्मिळ वनस्पती आढळून आली असून, जगाच्या पाठीवर ती फक्त कळसुबाई, हरिश्चंद्रगड व तोरणा किल्ला येथेच दिसून येते.

वनस्पती अभ्यासकांनी अंजनेरी पर्वतरांगेत आजवर ३८५ हून जास्त निरनिराळ्या सपुष्प वनस्पतींची नोंद केली आहे. त्र्यंबकेश्वर महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र अभ्यासक्रम शिकत असणारे विद्यार्थी शिवराम राऊतमाळे व किशोर भोये हे अंजनेरी येथे आपल्या नियमित अभ्यासासाठी गेले असता, त्यांना तेथे नवी वनस्पती दिसली. त्यांनी तिची छायाचित्रे घेऊन ती अभ्यासक डॉ. शरद कांबळे यांना दाखवली असता त्यांनी शहानिशा करून ही अतिदुर्मिळ असनारी ‘फ्लेमिंगिया रोलाई’ वनस्पती असून, ती शेंगा येणाऱ्या फॅबेसी कुळामधील असल्याचे सांगितले. या कुळासंदर्भातील तज्ज्ञ डॉ. संदीप गावडे यांनी देखील या वनस्पतीला दुजोरा दिला.

वनस्पती संशोधक पटवर्धन यांनी ही वनस्पती सर्वप्रथम कळसुबाई येथे १९०७ मध्ये शोधली होती. तिला बिल्लोरे व हेमाद्री या शास्त्रज्ञांनी सन १९८२ मध्ये ‘मौघानिया रोलाई’ हे नाव दिले. नंतर तिचे नामकरण ‘फ्लेमिंगिया रोलाई’ असे करण्यात आले. अंजनेरी पर्वतावर ही वनस्पती आढळल्याने तिचे अस्तित्व नाशिकमधील अन्य काही पर्वतरांगांवरही असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पंकज गर्ग नाशिक विभागाचे उपवनसंरक्षक, गणेशराव झोळे सहाय्यक वनसंरक्षक, विवेक भदाणे वनपरिक्षेत्र अधिकारी, ज्ञानेश्वर शिंदे अंजनेरीचे वनपाल आदींनी या कार्यास सहकार्य केले.

फ्लेमिंगिया रोलाईला या वनस्पतीस सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात फुले व फळे येत असतात. तिच्या फुलोऱ्यावर दाट केसाळ लव असते. त्यावरून ही वनस्पती चटकन ओळखता येते. अशी या वनस्पतीची वैशिष्ट्ये आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here