वैभव पगार
म्हेळुस्के : येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासराचा मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून. वनविभागाने तत्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांन कडून होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, म्हेळुस्के येथील शेतकरी रमेश नामदेव मेधने हे आपल्या शेतात वास्तव्यास असून आपल्या कुटुंबियांसमवेत शेती व्यवसाय करतात. शेतीला जोडधंदा म्हणून ते पशुधनही सांभाळतात.
मध्यरात्रीच्या सुमारास घराशेजारील गोठ्यात बांधलेल्या वासरावर अचानक बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात वासराचा जागीच मृत्यू झाला आहे. या हल्ल्याच्या आवाजाने रमेश मेधने यांना जाग आली व त्यांनी बाहेर येऊन बघितले असता बिबट्याने त्यांच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी सावध होत घरात पळ काढला.
आपल्या कुटुंबियांना आवाज देऊन त्यांनी उठवले. त्यानंतर फटाके फोडल्याने बिबट्या त्या जागेवरून पसार झाला. सततच्या होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून रात्री अपरात्री शेतीला पाणी देण्यासाठी जातांना जीव मुठीत धरून जावे लागते.
आणखी किती पशुधनाची व शेतकऱ्यांची हानी झाल्यानंतर वनविभागाला जाग येईल ? असा संतप्त सवाल नागरिक करत आहे. वनविभागाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी जोर धरत आहे
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम