भऊरचे सुपुत्र रमेश पवार यांची नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त पदावर बढती

0
95

देवळा प्रतिनिधी : भऊर ता.देवळा गावचे सुपुत्र आणि सध्या बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहआयुक्त पदावर कार्यरत असणारे रमेश पवार यांना नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नुकतीच बढती देण्यात आल्याने भऊर गावात व तालुक्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. अभ्यासू, कणखर आणि कार्यक्षम अधिकारी अशी ख्याती असणारे श्री.पवार हे वर्ष २००० पासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत होते.

रमेश पवार यांनी सहाय्यक आयुक्त म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेतील आपल्या कारकीर्दीस सुरूवात केली. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध विभागांचे सहाय्यक आयुक्त म्हणून त्यांनी अतिक्रमणांविरोधात कणखरपणे कार्यवाही करतानाच प्रशासकीय स्तरावर देखील अनेक सकारात्मक बदल अंमलात आणण्यात मोलाची भूमिका बजावली. वर्ष २०१२ पासून श्री पवार हे उपायुक्त पदावर कार्यरत होते. महापालिका उपायुक्त पदावर कार्यरत असताना त्यांनी धोरणात्मक स्तरावर कार्यरत राहून महत्त्वाचे योगदान दिले आहे.

वर्ष २०१५ ते २०१९ यादरम्यान तत्कालीन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांचे उपायुक्त म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. तर वर्ष २०१९ पासून ते उपायुक्त (सुधार) म्हणून कार्यरत होते. त्याचबरोबर उपायुक्त (आरोग्य) या पदाचाही कार्यभार त्यांच्याकडे होता. या अनुषंगाने बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील ‘कोरोना कोविड १९’ या संसर्गजन्य आजाराच्या प्रतिबंधात्मक कार्यवाहीचे नियोजन व व्यवस्थापन अव्याहतपणे त्यांनी केले. श्री. पवार यांच्या प्रभावी कामगिरीची दखल घेत महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी मागील वर्षी पदोन्नतीने त्यांची सहआयुक्त पदावर नेमणूक केली होती. आणि आता या सर्व कामगिरीची दखल घेत रमेश पवार यांची थेट नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदी वर्णी लागल्याने गावाचे नाव उंचावले आहे.

नाशिक मनपा आयुक्त म्हणून रमेश पवार यांना बढती मिळाल्याने आमदार डॉ.राहुल आहेर, भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर, बाजार समितीचे माजी सभापती योगेश आहेर, वसाकाचे माजी चेअरमन व गुरुदत्त शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.जे.डी.पवार, निवृत्त प्राचार्य डॉ.पी.एस.पवार, कसमादे शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी दिनकर देवरे, उद्योजक जगन पवार, कौतिक पवार, बाजार समितीचे संचालक जगदीश पवार, आनंद ऍग्रो चे जनसंपर्क अधिकारी अभिमन पवार, सरपंच दादा मोरे, सोसायटीचे चेअरमन काशिनाथ पवार आदींनी त्यांचे अभिनंदन केले.
# फोटो ; रमेश पवार


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here