नाशिक प्रतिनिधी : केंद्र सरकारच्या सेंटर फॉर कल्चरल रिसोर्सेस अँड ट्रेनिंग (सीसीआरटी) या स्वायत्त विभागातर्फे देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी नाशिकच्या आर्या शिंगणे हिची निवड झाली आहे. या विभागातर्फे नाटक, शास्त्रीय गायन-वादन, शिल्पकला, चित्रकला आदी ललित कलांमधील होतकरू मुला-मुलींना ही शिष्यवृत्ती दिली जाते. यातील २०१९-२० साठी नुकत्याच जाहीर झालेल्या यादीत आर्याला नाट्यविषयक शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे.
ही शिष्यवृत्ती जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना आर्या म्हणाली, ‘‘ही शिष्यवृत्ती मिळाल्याने निश्चितच आनंद झाला आहे. पदव्युत्तर शिक्षण घेत असतानाच मी माझ्या काही सहकारी विद्यार्थ्यांसह शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला होता. त्यासाठी आम्ही तयारीही केली होती. आता येत्या काळात विविध प्रकारच्या नाटकांमध्ये काम करण्याचा आणि त्याविषयी अधिक शिक्षण घेण्यासाठी या शिष्यवृत्तीचा मला उपयोग होणार आहे. मला भविष्यात समांतर रंगभूमी आणि भारतीय संस्कृतीतील मूल्यांची सांगड घालून, ते नाटकाच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण पद्धतीने लोकांसमोर मांडण्याची इच्छा आहे.’’
आर्याने नाटकाचे प्राथमिक धडे शाळा-महाविद्यालयातील नाटकांमधून गिरवले. आईच्या प्रोत्साहनामुळे तिने गणेशोत्सवासारख्या उत्सवांमधून सुरूवातीला विविध एकपात्री नाट्यप्रयोग सादर केले. त्यानंतर नाशिकच्या लोकहितवादी मंडळातून तिने नाटकांची खरी सुरूवात केली. एकांकिका स्पर्धा, राज्य नाट्य स्पर्धा यांतून आर्यातील रंगकर्मी घडत गेला. तिने पदवी शिक्षण राज्यशास्त्र विषयात पूर्ण केले असले, तरी नाटकाची आवड पाहून मुंबई विद्यापीठाच्या ललित कला विभागातून तिने नाटकाचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. आर्याला संस्कृत राज्य नाट्य स्पर्धेसाठी राज्यभरातून प्रकाशयोजनेचे प्रथम पारितोषिक, ‘चलो सफर करे’, ‘रोलेनस्पीयल’ या एकांकिकांसाठी दिग्दर्शन व अभिनयाचे पारितोषिक यासह विविध पारितोषिके मिळाली आहेत. भविष्यातही रंगभूमीसाठी कार्यरत राहण्याचा मानस तिने व्यक्त केला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम