भूषण चोभे
नाशिक प्रतिनिधी: पर्यावरण मित्र – मैत्रिणींनी आज रक्षाबंधनाच्या औचित्याने एक वेगळा उपक्रम राबविला. नाशिकरोडच्या शाहूनगर परिसरातील नागरिक छत्रपती शाहू महाराज पथावरील वृक्षांजवळ एकत्र येऊन त्यांनी झाडांना राखी बांधून पर्यावरण संवर्धनाचा बंध घट्ट केला.
पर्यावरण तज्ञ उदय थोरात यांनी वृक्षसंदेश दिला तर धनंजय देशपांडे यांनी प्राणवायूचा महत्वाचा स्रोत असणाऱ्या तुळशीचे महत्व विशद केले. महाराष्ट्र – गोवा हॅशटॅग चिपको चळवळीचे प्रणेते रोहन देशपांडे यांची ही संकल्पना होती. तिचे उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन स्वागत केले.
पर्यावरणाचे करूया संरक्षण, करुन वृक्षांचे रक्षाबंधन… हा उपक्रम आज रविवारी ( दि.२२) राखीपौर्णिमेच्या औचित्याने राबविण्यात आला. यावेळी वृक्षसंवर्धनाचे रक्षाबंधन साजरे करण्यात आले. उपक्रमाचे प्रमुख रोहन देशपांडे यांनी निसर्गाचे महत्त्व कोरोनाच्या संकटात नव्याने अधोरेखित झाल्याचे सांगितले. वृक्ष जगले तर आपण जगू व पुढच्या पिढीला जगणे शक्य होईल हा संदेश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ज्यावेळी प्राणवायूची कमतरता भासली तेव्हा सर्वांना मिळाला याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
वृक्षारोपण, वृक्षांची जोपासना व संवर्धन काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाला डॉ.शुभांगी रत्नपारखी, विवेक गोडसे,सचिन ठाकूर, गणेश ताजनपुरे,पूर्वा नाईक,राधिका नाईक, भार्गवी देशपांडे, दीप्ती देशपांडे, डॉ.समता धुप्पड, किशोर देशपांडे, वीणा, अपूर्वा व विजय दांडेकर उपस्थित होते. मुलांनीही धीटपणे आपल्या भावना व्यक्त केल्या.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम