Skip to content

हिरे महाविद्यालयात जागतिक कविता महोत्सव संपन्न


नाशिक प्रतिनिधी : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात कृत्या पोएट्री मुव्हमेंट, वर्ल्ड पोएट्री मुव्हमेंट व महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा, महाविद्यालयाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष व भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जागतिक कविता महोत्सवाचे आयोजन दुरदृश्यप्रणालीद्वारे (युट्युब व झूम द्वारे) करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य व महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे विश्वस्त डॉ. बी. एस. जगदाळे होते.

या महोत्सवात स्वीडन येथील बेन्टबर्ग, उझबेकिस्थान येथील अझम अबेदॉ, केरळ येथील शांतन हरिदासन, दिल्ली येथील सविता सिंग, गुजरात येथील कमल वोरा, ओरिसा येथील केदार मिश्र, महाराष्ट्रातील कवी प्रकाश होळकर, कवी दासू वैद्य, कवी विजयकुमार मिठे सहभागी झाले होते. या सादर केलेल्या सर्व कवितांचे मराठी अनुवाद स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख डॉ. पृथ्वीराज तौर व महाविद्यालयाच्या मराठी विभागप्रमुख प्रा. विद्या सुर्वे बोरसे यांनी केले आहेत. यावेळी कवी प्रशांत केंदळे व मराठी विभागप्रमुख प्रा. विद्या सुर्वे बोरसे यांनी स्वीडन, फ्रेंच, मल्याळम व गुजराती कवींच्या कवितांचे इंग्रजी, हिंदी व मराठी अनुवाद सादर केले. तीन तास रंगलेल्या या जागतिक काव्यमैफिलीत अतिशय दर्जेदार जागतिक कविता सादर केल्या गेल्या.

“बापू तुमचे बोट पकडले आहे
तर सत्य म्हणजे काय हे ठाऊक आहे
पण आचरण नाही करू शकत
असत्याचा द्वेष करतो मी पण त्याग नाही करू शकत
तुम्ही सत्याच्या, मी द्वेषाच्या प्रयोगात बुडालो आहे” ही गांधी दीडशे या शीर्षकाची गुजरात येथील प्रसिद्द कवी कमल वोरा यांची वास्तवाचे दर्शन घडवणारी कविता रसिकांच्या मनाला भिडली. तर

“मी कदाचित आनंद नसेल,
मी कदाचित प्रकाश नसेल,
मी कदाचित उमेद नसेल
पण ते सगळे ज्यांना मला फुलवायचे होते
मी माझ्या लोकांना आनंदी ठेवतो अगदी माझ्या दुखातही!
यापेक्षा चांगले जीवन आहे का? एका विश्वासू माणसासाठी!” अशी रसिकांच्या अंतकरणात आशावादाचे बीज पेरणारी महत्वाची कविता आंतरराष्ट्रीय ख्यातीचे उझबेकिस्थान येथील कवी अझम अबेदॉ यांनी सादर केली. दिल्ली येथील स्रीवादी कवयित्री सविता सिंग यांच्या ‘मी कुणाची बाई आहे’ आणि ‘विमलाचा प्रवास’ या प्रखर स्रीदर्शन घडवणाऱ्या कवितांना भरभरून दाद मिळाली. कवी विजयकुमार मिठे यांनी शेतीमातीचे गणित आणि साहेब या अस्सल शेतकऱ्याच्या वेदना मांडणाऱ्या कविता सादर केल्या. कवी दासू वैद्य यांनी ‘मागणं’ आणि ‘ते दिवस’ या कविता तर कवी प्रकाश होळकर यांनी कोरडे नक्षत्र या त्यांच्या कवितासंग्रहातील कविता सादर करून रसिकांची मने जिंकली. सर्व कवींच्या रसिकांची दाद मिळवली.

“जागतिक कविता महोत्सवाद्वारे अनेक भाषांतील कवितांचे आदानप्रदान होत असून असे कार्यक्रम संस्कृती संवर्धनाच्या दृष्टीकोनातून महत्वाचे आहेत. आपली भाषा जगापर्यंत कवितेच्या माध्यमातून पोहचते आहे व जागतिक कविता आपल्याला ऐकायला मिळते आहे हे या जागतिक कार्यक्रमाचे फलित आहे. असा जागतिक कविता महोत्सवाचा प्रयोग पहिल्यांदाच दुरदृश्यप्रणालीद्वारे आमच्आया महाविद्यालयाने आयोजित केला त्याचा विशेष आनंद आहे.” असे उद्गार आपल्या मनोगतात प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे यांनी काढले. या काव्यमहोत्सवाचे सूत्रसंचालन स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय भाषातज्ञ डॉ. नीना गोगटे यांनी केले व उपस्थित कवी व रसिकांचे आभारही मानले. महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा व संस्थेच्या विश्वस्त डॉ. योगिता हिरे व कृत्या पोएट्री मुव्हमेंटच्या आशिया खंडाच्या समन्वयिका रती सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम घेण्यात आला.

या काव्य महोत्सवात कार्यक्रमाच्या संयोजिका प्रा. विद्या सुर्वे बोरसे यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. प्रा. डॉ. मृणाल भारद्वाज यांनी सर्व कार्यक्रमाचा अभिप्राय सादर केला. या व्याख्यानासाठी उपप्राचार्य डॉ. नंदू पवार, गुणवत्ता व हमी कक्षाच्या समन्वयिका व अधिष्ठाता प्रा. डॉ. मृणाल भारद्वाज, परीक्षा व एच.आर.आणि वित्त पर्यवेक्षक डॉ. विनित रकिबे, शैक्षणिक पर्यवेक्षक डॉ. एस. एस. चोबे, इस्टेट पर्यवेक्षक, डॉ. एस. डी. पाटील, कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्या डॉ. सुचिता सोनवणे,नॅक चे समन्वयक डॉ. किशोर निकम महाविद्यालयातील विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!