Oath Ceremony | राज्यात 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि त्यात महायुतीला बहुमत मिळाले. तेव्हापासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण होणार..? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते. गेल्या अनेक दिवसांपासून हा सस्पेन्स कायम होता. तर महायुतीत यावरून चढाओढ आणि नाराजीनाट्यही पहायला मिळाले. दरम्यान, अखेर आज हा ससपेन्स संपला आणि मुंबईत आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुती सरकारचा भव्य दिव्य शपथविधी सोहळा पार पडला.
यावेळी राज्याचे एकवीसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली. त्यांच्या पाठोपाठ एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना स्मरून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर, विक्रम रचत अजित पवार (ajit pawar) यांनीही यावेळी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या भव्य दिव्य शपथविधी सोहळ्यासाठी अनेक उद्योजक, राजकीय, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामदास आठवले, राजनाथ सिंह, जे. पी. नड्डा यांच्यासह भाजप आणि मित्रपक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. तसेच भाजपशासित राज्याचे २२ मुख्यमंत्री देखील या सोहळ्याला उपस्थित होते. मोठ्या संख्येने राज्यभरात भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्ते जल्लोष व्यक्त करत आहेत. आज केवळ मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. यानंतर 11 तारखेला मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचीही माहिती आहे. त्यामुळे आता कोणत्या पक्षाला किती आणि कोणकोणती मंत्रीपदं मिळणार..? याबाबतही उत्सुकता आहे. तर आता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे लगेचच पदभार स्वीकारतील आणि यानंतर तिन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद बोलावली आहे.(Oath Ceremony)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम