सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | बंद घरे सध्या चोरट्यांच्या निशाण्यावर असल्याने एक-दोन दिवस घरे कुलूपबंद दिसली की, अशा घरांमध्ये चोऱ्या होण्याचे प्रमाण देवळा शहरात वाढू लागले आहे. येथील ओमनगर तसेच ज्ञानेश्वर नगरात रविवार (दि .१) च्या पहाटेच्या सुमारास बंद घराचा फायदा उठवत अज्ञात चोरट्यांनी घरे फोडली. किती ऐवज लंपास केला याबाबत निश्चित माहिती मिळू शकली नसली तरी मालेगाव रस्त्यावरील शेतकऱ्याच्या दोन बकऱ्या रात्रीच्या वेळी चोरीला गेले आहेत.
रात्रीच्या सुमारास कुलूप तोडून चोरट्यांचा डल्ला
ज्ञानेश्वर नगरात राहणारे बँक ऑफ बडोदा, देवळा येथील अधिकारी जयदेवसिंग ठाकोर हे सहकुटुंब बाहेरगावी गेले असल्याने घराला कुलूप होते. या बंद घराचा फायदा घेत चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास कुलूप तोडून घरात प्रवेश करत सामान अस्ताव्यस्त केले. सदर कुटुंब बाहेरगावी असल्याने घरातून किती ऐवज चोरीला गेला याची निश्चित माहिती मिळू शकली नाही.
चोरटे सीसीटीव्हीत कैद
ओमनगर येथील रमेश भामरे यांच्या मालकीचेही बंद घराचे कुलूप तोडले मात्र घरात फारसे काही सामान नसल्याने त्यांना रिकाम्या हाती परतावे लागले. येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हातात लोखंडी टॉमी घेत तिघेजण प्रत्येक घराचा कानोसा घेत असल्याचे दिसून आले. मालेगाव रोडवरील वसंत आहेर या शेतकऱ्याची एक बकरी व बोकड चोरी झाले आहेत. चोरीच्या घटना घडू नयेत यासाठी पोलीस गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.
Deola | सहकार भारती जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा सचिव पदी दे.म.को.चे संचालक प्रमोद शेवाळकर
शेतकऱ्यांनी सावध राहण्याचे आवाहन
सध्या लग्नघरे, डाळिंबबागा, कांदे याकडेही चोरट्यांनी आपला मोर्चा वळवला असल्याने सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे सांगितले जात आहे. लग्नानिमित्त धावपळीचा फायदा घेत तेथून साहित्य लंपास केले जाण्याच्या घटना घडत आहेत. डाळिंब व कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने तिकडेही चोरी झाल्याच्या घटना गुंजाळनगर शिवारात झाल्या असल्याने शेतकऱ्यांनी सावध राहण्याचे आवाहन केले जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम