BJP Political | विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज जाहीर झाल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली असून या बंडखोरीमुळे महायुती आणि महाआघाडीला काही मतदारसंघांमध्ये फटकाही बसला आहे. त्यामुळे यावर भाजपकडून आता कठोर कारवाई करण्यात आली असून भाजपने सर्व मतदारसंघातील 40 बंडखोराविरुद्ध कारवाई केली आहे. पक्ष शिस्तीचा भंग केल्याप्रकरणी बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी.
भाजपकडून बंडखोरांवर कारवाई
भाजपकडून नेवासा मतदारसंघातील माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे आणि श्रीगोंदातील पदाधिकारी सुवर्णा पाचपुते यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. बंडखोरांविरुद्ध कारवाई झाल्यानंतर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बंडखोरांविरुद्ध काय कारवाई केली जाईल? याकडे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. नेवासा मतदारसंघातील माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे बंडखोरी केली होती. तसेच बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या पाठिंब्यावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र पक्षाने माघार घ्यायला सांगून देखील मुरकुटे यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने त्यांच्यावर भाजपकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यांची पक्षातून हकालपट्टी केली गेली असून भाजपकडे असलेली ही नेवासा विधानसभेची जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे गेली आहे.
भाजपमधून सर्वाधिक बंडखोर
तर नेवासा मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्यामुळे जिल्हाध्यक्ष विठ्ठल लंघे यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे अस्वस्थ होत बाळासाहेब मुरकुटे यांनी बंडखोरी कायम ठेवली आहे. तसेच मुरकुटे यांच्या मागोमाग श्रीगोंदा मतदारसंघातील सुवर्णा पाचपुते यांच्याविरुद्ध देखील भाजपकडून कारवाई करण्यात आली असून सुवर्णा पाचपुते यांनी श्रीगोंदा मतदार संघात अपक्ष उमेदवारी कायम ठेवली. महायुतीत एकुण 50 नेत्यांनी बंडाचे अस्त्र हाती घेतले होते. यामध्ये भाजपमध्ये सर्वाधिक बंडखोर होते. भाजपमधून तब्बल 19 जणांनी तर शिवसेनेकडून 16 व राष्ट्रवादी काँग्रेसकडून 1 ने बंडाचे निशाण फडकवले. भाजपकडून बंडखोरांची समजूत काढण्याचा वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आला. चर्चा केली गेली. काही ठिकाणी चर्चा यशस्वी ठरली. परंतु काही ठिकाणी चर्चा होऊन देखील बंडखोरी कायम राहिल्यामुळे शेवटी भाजपने बंडखोरांविरुद्ध कारवाई केली आहे.
BJP Politics | भाजपची दुसरी यादी जाहीर; नाशिक मध्यचा तिढा सुटला!
निष्ठावंतांकडून बंडखोरांवर कारवाईची मागणी
पक्षातील निष्ठावंतांनी बंडखोराविरुद्ध कारवाई व्हावी असा सूर धरला होता. कारवाई न केल्यास वेगळा संदेश जाईल असे त्यांचे म्हणणे होते. शेवटी भाजपने बंडखोराविरुद्ध कारवाईचा बडगा उचलल्याने आता शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसकडून बंडखोराविरुद्ध काय कारवाई होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम