गुणवत्तावाढ व विकासासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता – डॉ. कावडे

0
42

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; गुणवत्तावाढ व विकासासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता आहे. उच्च शिक्षण संस्थांनी विद्यार्थी केंद्री राहून मूलभूत मूल्ये विद्यार्थ्यांवर बिंबवायला हवेत. देशाच्या तुलनेत महाराष्ट्र हे राज्य नॅक मूल्यांकनाच्या दृष्टीने अग्रेसर आहे. असे उद्गार बेंगलोर येथील नॅकचे सल्लागार डॉ. देवेंद्र कावडे यांनी काढले.

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित एकदिवसीय “नॅक मूल्यांकन आणि मान्यता प्रक्रिया एक आढावा” या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते

संस्थेचे समन्वयक डॉ. अपुर्वभाऊ हिरे यांच्या मार्गदर्शनाने आयोजित या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य व महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे विश्वस्त डॉ. बी. एस. जगदाळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सहसचिव डॉ. व्ही. एस. मोरे व संस्थेचे मुख्य अधिकारी जयेश पै उपस्थित होते.

डॉ. कावडे यांनी नॅक या संस्थेच्या मूलभूत मूल्यांचा परिचय करून दिला. राष्ट्रीय विकासातील योगदान आणि उत्कृष्टतेच्या शोधावर भर देतांनाच सुधारित मान्यता फ्रेमवर्क अंतर्गत नॅकद्वारे मान्यताप्राप्त एकूण विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांची माहिती दिली. देशातील सर्वाधिक मान्यताप्राप्त संस्था महाराष्ट्रात आहेत, महाराष्ट्र सरकारचे धोरण आणि संस्थांच्या इच्छाशक्ती यासाठी महत्वाची आहे हे स्पष्ट केले. नॅक मूल्यांकन प्रक्रिया आणि नॅक मुल्यांकनासाठीचे एकूण सात निकषांबाबत उपस्थितांना माहिती दिली. एकूणच नॅकची प्रक्रिया सर्व उपस्थितांना समजावून सांगतांना अनेक उदाहरणे दिली. त्यानंतर प्रश्नोत्तराचे सत्र झाले. उपस्थितांच्या प्रश्नांना डॉ. कावडे यांनी समर्पक उत्तरे दिली.

संस्थेचे मुख्य अधिकारी जयेश पै यांनी डॉ. कावडे यांच्या अभ्यासपूर्ण भाषणाचे कौतुक केले आणि उच्च शिक्षण संस्थांच्या गुणवत्तेनुसार वर्गीकरण करण्यासाठी नॅक आणि एन. बी. ए. मूल्यांकनाचे महत्त्व सांगितले.

प्राचार्य डॉ. बी.एस. जगदाळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. कावडे यांच्या कामाची माहिती दिली व महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेंतर्गत चालवल्या जाणाऱ्या महाविद्यालयांची माहिती दिली. ज्या महाविद्यालयांना चांगली ग्रेड आहे अशा महाविद्यालय व संस्थांना शासनाकडून जास्तीचा निधी दिला जातो त्या तुलनेत आदिवासी व मुलभूत सुविधा नसणाऱ्या महाविद्यालय व संस्थांवर अन्याय होतो हे स्पष्ट केले.

महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या अधिष्ठाता व अंतर्गत गुणवत्ता व हमी कक्षाच्या समन्वयक डॉ. मृणाल भारद्वाज, यांनी अंतर्गत गुणवत्ता व हमी कक्षाद्वारे नॅक मूल्यांकन आणि मान्यता प्रक्रियेसाठी केलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच प्रमुख वक्ते डॉ. देवेंद्र कावडे यांचा परिचय करून दिला.

नॅक समन्वयक डॉ. किशोर निकम यांनी डॉ. कावडे यांच्या माहितीपूर्ण सत्राबद्दल आणि नॅक मूल्यांकन आणि मान्यता प्रक्रिया याविषयी अतिशय सोप्या भाषेत दिलेल्या माहितीबद्दल कौतुक केले व सर्व मान्यवर आणि सहभागींचे आभार मानले.
या चर्चासत्रासाठी संस्था संचलित विविध महाविद्यालयातील प्राचार्य, उपप्राचार्य, अंतर्गत गुणवत्ता व हमी कक्षाचे समन्वयक, नॅक समन्वयक व प्राध्यापक उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here