नाशिक मनपात चाललंय काय ? ‘महापौर’ विरुद्ध ‘विरोधक’ संघर्ष अजून किती दिवस ?

0
20

नाशिक प्रतिनिधी : नाशिक मनपात भाजपाची सत्ता तर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. यामुळे नाशिक महापालिकेत विरोधी बाकावर असलेले शिवसेना,राष्ट्रवादी,काँग्रेस हे पक्ष सध्या आक्रमक झाले आहेत. सत्ताधारी विरुद्ध विरोधक हा सामना जोरदार सुरू आहे. मनपाच्या मालकीच्या मिळकती या बिल्डरांच्या घशात घालताहेत असे विधान विरोधक सातत्याने करीत आहे. या आरोपात तथ्य नाही. आरोप अत्यंत चुकीचे असून जीर्ण झालेल्या इमारती बीओटीच्या माध्यमातून नव्याने विकसित करण्यात येणार आहेत. तसेच त्याची मालकी हक्क महानगरपालिकेकडेच राहणार असल्याची माहिती महापौर सतिष कुलकर्णी यांनी दिली. विरोक सत्ताधारी विरोधात संशयाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याने देखील कुलकर्णी यांनी सांगितले.

‘बीओटी‘ (BOT) तत्वावर 50 टक्के बांधीव क्षेत्र विकासकास 33 वर्षांकरिता लिज वर देण्यात येऊन उर्वरित 50 टक्के बांधीव क्षेत्र मनपा (NMC) आजच्या बाजारभावाने भाडेतत्वावर देईल. यामुळे घरपटटी व पाणीपटटीच्या उत्पन्नामध्येही वाढ होईल. याचा फायदा सर्वसामान्य व महापालिकेला होणार असल्याचा दावा कुलकर्णी यांनी केला.

त्यामुळे मनपा मालकीच्या इमारती बिल्डरांच्या घशात घातल्या हे म्हणणे अतिशय बेजबाबदारपणाचे आहे. विरोधकांनी अंतर्मुख होऊन विचार करून विकासाभिमुख नाशिक होण्यासाठी या योजनेला मोकळ्या मनाने संमती द्यायला हवी. मात्र विरोधक संकुचित विचारांनी वगताय, विकासाचा दृष्टिकोन त्यांचा नाही त्यांनी आत्मपरीक्षण करावे असा सल्ला यावेळी दिला. पक्षीय राजकारणामध्ये काही मंडळी गुंतुन पडल्यामूळे चांगले कार्य व वाईट काय हे त्यांना कळत नसल्याने नाशिककरांचे हे दुर्दैव असल्याचे महापैरांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे. विरोधकांनी केवळ विरोध दर्शवणे पेक्षा आणि राज्य शासन त्यांचे असल्याकारणाने त्यांनी चांगल्या मनाने नाशिक शहरातील जटिल प्रश्न शासनामार्फत सोडविले असते तर ते अधिक चांगले झाले असते. असा टोला देखील त्यांनी लगावला.

बीओटी प्रकल्प नियमात असनू तो नियमातच करू व त्याची पुढील वाटचाल देखील ही नियमातच होईल याबाबत कोणतीही शंका मनात आणू नये, असे आवाहन त्यांनी केले. सत्ताधारी चुकीचे काम केले तर लवकरच होणार्‍या निवडणुकीत जनता जनार्दन आम्हाला धडा शिकवेल मात्र वेळोवेळी मनपाच्या कामांच्या बाबतीत ज्यांनी विकास होऊ दिला नाही त्यांचाही जनता जनार्दन नक्कीच विचार करेल हे त्यांनी लक्षात ठेवावे, असे महापौरांनी स्पष्ट केले.

बीओटीबाबत प्रसारमाध्यमातून विरोधाक चुकीची विधाने करुन नाशिककरांची दिशाभूल करीत आहे. मनपाच्या ज्या जागा 60 ते 70 वर्षापासून अडगळीत पडल्या आहेत, त्यांचे पुनर्वसन होणे गरजेचे आहे. द्वारकाच्या जागेत टपर्‍या टाकण्यात आले आहे. ही जागा वर्षानुवर्ष पडून आहे. त्याठिकाणी विभागीय कार्यालय व शॉपिंग सेंटर मॉल उभारण्यात येणार आहे. गत 25 वर्षापासून पूर्व विभाग नगरसेवकांनी विभागीय कार्यालय स्वतंत्ररित्या बांधण्यात यावे अशा आशयाचे ठराव पारित केलेले आहे.

भद्रकाली स्टॅन्ड परिसराकडेही लक्ष देणे गरजेचे आहे महानगरपालिकेच्या जागे वरच भद्रकाली स्टँड परिसराच्या जागेत शॉपिंग सेंटर बांधले जाणार आहेत. त्यासंदर्भात ज्या ज्या ठिकाणी बीओटी तत्वावर स्कीम राबवावयाची आहे त्या त्या ठिकाणचा प्रशासनाने अभ्यास करुन याबाबत मनपा मिळकतींवर ही स्कीम राबविणेत येणार आहे. या प्रकल्पांमध्ये नाशिक महानगरपालिकेच्या कोणताही पैसा लावला जाणार नसल्याने बांधा वापरा व हस्तांतरित करा या तत्वावर योजना राबविण्यात येणार आहे. यामुळे महापालिकेला कसलाही भार असणार नाही.

होणाऱ्या प्रकल्प सल्लागारांच्या माध्यमातून या सर्व मिळकतींच्या प्रकल्पांचा व्यवसायिक शक्यता अहवाल, संकल्पित इमारतींचे नकाशे,आराखडे ,प्राकलने, निविदा तयार करणे मनपाच्या अधिकृत भाडेकरुंना या प्रकल्पात कसे सामावून घेता येईल ते तपासणे तसेच कायदेशीर व तांत्रिक बाबी तपासून आवश्यक त्या सेवा पुरविणेआदीसाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामूळे महानगरपालिकेच्या मिळकती बिल्डरांचा घशात घातल्या, लिलाव करणे अशा बातम्या चुकीच्या आहेत.या अफवानां नाशिकर बळी पडणार नाहीत असे देखील महापौर म्हणाले.

गेल्या वर्षी म्हणजेच 11/12/2020 च्या महासभेत सदरचा विषय दाखलमान्य करुन घेणेत येऊन त्याचप्रमाणे त्याला मंजूरी दिली आहे व प्रशासनाने सुध्दा याबाबत मान्यता दिलेली आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामध्ये प्रचलित अधिनियमातील तरतुदीनुसार ठराव हा शासकीय किंवा अशासकीय असा भेदाभेद नाही, त्यामूळे सदर ठराव अशासकीय असे म्हणणे चुकीचे आहे.
– सतिष कुलकर्णी , महापौर

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here