शिवसेनाप्रमुखांच्या आठवणींनी जनसागरास अश्रू अनावर

0
18

माधुरी रोहम

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शालिमार येथील शिवसेना कार्यालयात आयोजित अभिवादन सोहोळ्याच्यावेळी त्यांच्या आठवणी सांगताना उपस्थित जनसागरास अश्रू अनावर झाले होते.

बाळासाहेबांचे नाशिककरांशी अतूट नाते होते.त्यांनी अनेकवेळा विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने नाशिकला भेटी दिल्याने प्रत्येक नेते आणि कार्यकर्त्यांना ते वैयक्तिकरित्या ओळखत होते. अनेकांशी त्यांचे खास जिव्हाळ्याचे नाते होते. बाळासाहेबांसारखा नेता यापुढे होणार नाही,असे मान्यवर नेत्यांनी त्यांना अभिवादन करतांना सांगितले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्व प्रभावशाली आणि दमदार होते.ते कुशल व्यंगचित्रकार, प्रतिभावंत राजकारणी,उत्कृष्ट संपादक आणि उत्कृष्ट वक्ते होते. कणखर भाषाशैली हेही त्यांच्या व्यक्तिमत्वाचे खास वैशिष्ट्य होते,असे प्रतिपादन शिवसेनेचे उपनेते माजीमंत्री बबनराव घोलप यांनी केले.

बाळासाहेब ठाकरे हे कट्टर हिंदुत्ववादी होते.त्यांचे व्यक्तिमत्व वाघासारखे होते. शिवसेनेची स्थापना करून त्यांनी महाराष्ट्रातील मराठी बांधवांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. देशभरातील सर्व महनीय व्यक्ती त्यांना भेटावयास मातोश्रीवर येत यावरूनच बाळासाहेब किती महान होते याची प्रचिती येते,असे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी सांगितले.

1995 साली शिवसेनाप्राणि युतीचे सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आले होते.नाशिकमध्ये शिवसेनेचा मेळावा झाल्यानंतरच हे यश मिळाले याची जाणीव शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना होती. त्यामुळेच नाशिकवर त्यांचे विशेष प्रेम होते. महाराष्ट्रातील तमाम मराठी बांधवांना एकत्रित करण्यास त्यांनी आपले उभे आयुष्य वेचले. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात त्यांची भूमिका मोलाची राहिली. गर्वसे कहो हम हिंदू है चा नारा त्यांनी दिला. त्यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते,असे सांगून महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी त्यांना विनम्र अभिवादन केले.

यावेळी खा.हेमंत गोडसे,मनपा विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, सुनील बागुल, माजी आमदार वसंत गिते, योगेश घोलप,माजी महापौर विनायक पांडे, मनपा गटनेते विलास शिंदे, माजी महापौर यतीन वाघ,युवासेना जिल्हाधिकारी राहुल ताजनपुरे,भारतीय विद्यार्थी सेना जिल्हा संघटक वैभव ठाकरे,
माजी महानगरप्रमुख देवानंद बिरारी, सचिन मराठे, महेश बडवे, महानगर संघटक योगेश बेलदार, नाशिकरोड सभापती प्रशांत दिवे, सिडको सभापती सुवर्णा मटाले, स्थायी समितीचे माजी सभापती संजय चव्हाण,महिला आघाडी पदाधिकारी मंदा दातीर, मंगला भास्कर, प्रेमलता जुन्नरे, शोभा मगर, शोभा गटकळ, लक्ष्मी ताठे यांच्यासह शिवसेना नगरसेवक, पदाधिकारी, शिवसैनिक, शिवसेनाप्रेमी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here