Dead thread : राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर अजित पवारांसोबत जात सत्तेत सहभागी झालेले मंत्री छगन भुजबळ यांना सोमवारी रात्री जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी पुणे शाखेच्या पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.
मला सुपारी मिळाली आहे, उद्याच मी भुजबळांना मारणार आहे असे फोनवरून या व्यक्तीने धमकावल्याची माहिती भुजबळांचे स्वीय सहाय्यक यांनी पुणे पोलिसांना दिली. याची ऑडिओ क्लिपसुद्धा आता समोर आली आहे. छगन भुजबळ यांना धमकी देणाऱ्या प्रशांत पाटीलला महाडमधून पुणे गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. दारु पिऊन भुजबळांना धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली असून भुजबळ यांना धमकी देणारा प्रशांत पाटील मूळचा कोल्हापूरचा आहे. त्याने गुगल सर्च वरून भुजबळांच्या स्वीय्य सहाय्यकाचा नंबर काढून महाडमधून फोनवरुन छगन भुजबळांना धमकी दिली होती.
छगन भुजबळ हे सध्या पुण्यामध्ये असल्याने पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बंड झाल्यादिवसापासून छगन भुजबळ यांनी आपले ‘राजकीय गुरु’ असलेल्या शरद पवार यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. शरद पवारांनी सुद्धा आपल्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात भुजबळ प्रतिनिधीत्व करत असलेल्या येवला मतदारसंघातून केली. येवला येथे झालेल्या सभेत पवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यामुळे थोरले पवार विरुद्ध भुजबळ यांच्यामधला संघर्ष मोठा असल्याच स्पष्ट झालं, यातच छगन भुजबळ यांना आलेल्या धमकीचा फोन आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. पण तूर्त पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीने दारू पिऊन धमकी दिली असल्याच समोर आलं आहे.
प्रशांत पाटील नामक तरुणाचा फोन : मंत्री छगन भुजबळ हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. सोमवारी रात्री त्यांचा मुक्काम हा पुण्यातील व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस मध्ये होता. रात्री सव्वा अकरा वाजता त्यांच्या स्वीय सहायकाच्या मोबाईलवर अज्ञात तरुणाचा फोन आला. त्याने भुजबळ यांचे नाव घेत, मी तुमची सुपारी घेतली असून उद्या मी तुम्हाला मारुन टाकणार आहे, अशी थेट धमकी दिली. ही माहिती तातडीने माहिती पुणे पोलिसांना देण्यात आली.
मद्यधुंद अवस्थेत केला फोन : जेव्हा धमकीचा फोन आला तेव्हा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गोष्टीचे गांभीर्य ओळखत तांत्रिक तपास केला. पहाटे सहा वाजेच्या सुमारास या तरुणाला महाडमधून ताब्यात घेण्यात आले आहे. प्राथमिक चौकशीत त्याने हे सर्व कृत्य दारूच्या नशेत केले असल्याचे समोर आलं असून हा आरोपी तरुण मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील रहिवासी आहे तो ऑपरेटर म्हणून काम करतो. गुगलवर सर्च करून त्याने भुजबळांच्या पीएचा मोबाईल क्रमांक मिळवला आणि फोन केला. याप्रकरणी पुढील तपास पोलीस अधिक तपास करत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम