Nashik : सोमवारी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान मुंबई आग्रा महामार्गावरील शिरवाडे वनी या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसने एका दुचाकीला चिरडल्याने एकाच कुटुंबातील तिघा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यातूनच संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मंगळवारी सकाळी महामार्ग रोखून धरत आंदोलन केलं आहे.
सोमवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास पिंपळगाव बसवंत येथून जवळच असलेल्या शिरवाडे वनी फाट्यावर दुचाकी क्रमांक (एमएच 17 बीआर 7972) आणि परिवहन महामंडळाची बस क्रमांक (एमएच 20 बीएल 2461) मध्ये जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये दुचाकी वर असलेल्या तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. नितीन भास्कर निफाडे, मयूर चंद्रकांत निफाडे आणि सुभाष माणिकराव निफाडे अशी तिघा मयत झालेल्या तरुणांची नावे आहेत. या प्रकरणी बस चालक दीपक शांताराम पाटील याला स्थानिक पोलिसांनी अटक देखील केली आहे. मात्र शिरवाडे वनी फाट्यावर योग्य पद्धतीने स्पीडब्रेकर बसवण्यात आले नाही. यामुळे दोनही बाजूनी येणाऱ्या वाहनांची गती जास्त असल्याने या ठिकाणी नेहमीच अपघात होत असतात, स्थानिकांकडून या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी याआधी देखील अनेक वेळा करण्यात आली आहे. याकडे संबंधित प्रशासन व अधिकारी लक्ष देत नसल्याने हा अपघात झाला आणि एकाच कुटुंबातील तिघा जणांना आपला जीव गमावा लागला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून यातूनच मंगळवारी सकाळच्या सुमारास या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याची मागणी करत संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग रोखून धरला. दरम्यान खासदार तसेच केंद्रीय मंत्री भारतीय पवार यांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांना आश्वासन दिल असल्याची माहिती देखील समोर येत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम