धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील जैताणे येथील मंडळ अधिकाऱ्यास लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे.
विजय वामन बावा वय 46 असे लाच स्वीकारताना अटक करण्यात आलेल्या मंडळ अधिकाऱ्याचे नाव आहे.
तक्रारदार याची मौजे भामेर (ता. साक्री, जि. धुळे) येथे गट नंबर 43, 44 याठिकाणी शेतजमीन असून, त्यांची कौटुंबिक वाटणी करावयाची असल्याने त्यांनी निजामपूरचे मंडळ अधिकारी विजय बावा यांची दि. 16 जून रोजी भेट घेतली असता त्यांनी तक्रारदाराकडे 18 रुपयांची मागणी केली.
तडजोडीअंती 15 हजार रुपये सांगून त्यापैकी अगोदर घेतलेले आठ हजार रुपये वजा जाता सात हजार रुपयांची पंचांसमक्ष मागणी करून मौजे भामेर (ता. साक्री, जि. धुळे) येथे तक्रारदारांच्या राहत्या घरी सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना आलोसे विजय बावा यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षिका शर्मिष्ठा वालावलकर, सापळा पर्यवेक्षण अधिकारी अभिषेक पाटील व सापळा अधिकारी प्रकाश झोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली राजन कदम, शरद काटके, भूषण खलाणेकर, संतोष पावरा भूषण शेटे, रामदास बारेला, प्रशांत बागूल, मकरंद पाटील, प्रविण पाटील, मपोशी गायत्री पाटील, रोहिणी पवार वनश्री बोरसे, चालक सुधीर मोरे व जगदीश बडगुजर यांनी केली.
तर दुसरी कारवाई नंदुरबार जिल्ह्यात करण्यात आली आहे.
नवापूर येथील दि एन. डी. ॲण्ड एम. वाय. सार्वजनिक हायस्कूलच्या वरिष्ठ लिपिकास लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. विनोद साकरलाल पंचोली, (वय 50, रा. नवापूर, जि. नंदुरबार) असे लाच स्वीकारताना अटक करण्यात आलेल्या वरिष्ठ लिपिकाचे नाव आहे.
यातील तक्रारदार यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांच्या रजा रोखीकरणाची रक्कम पंचोली यांनी दिलेल्या धनादेशाद्वारे तक्रारदार यांच्या बँक खात्यात जमा झाली होती. तक्रारदार यांची रजा रोखीकरणाची रक्कम काढून दिल्याबद्दलच्या मोबदल्यात विनोद पंचोली यांनी तक्रारदार यांच्याकडे 45 हजार रुपयांच्या लाचेच्या रकमेची मागणी करून ही रक्कम पंच व साक्षीदार यांच्यासमक्ष स्वीकारली आहे. नवापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षिका शर्मिष्ठा वालावलकर व सापळा अधिकारी राकेश आ. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विलास पाटील, ज्योती पाटील, पोलीस नाईक देवराम गावित व अमोल मराठे यांच्या पथकाने केली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम