उदयकुमार राज्याच्या राजकारणात स्थिरावणार ? ; मंत्री उदय सामंत यांच्या भेटीने चर्चांना उधाण

0
58

नाशिक : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे काल नाशिक दौऱ्यावर असताना शिवसंग्रामचे युवक प्रदेशाध्यक्ष उदयकुमार आहेर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली नावाला जरी सदिच्छा भेट असली तरी शिवसंग्राम संघटनेच्या फुटिनंतर या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. विनायक मेटे यांच्या निधनानंतर संघटनेची झालेली वाताहत डोळ्यासमोर आहे. संघटनेत उभी फूट पडली असून दोन गट निर्माण झाले आहेत. आम्हीच खरी शिवसंग्राम हा दोन्ही गटांनी दावा केला आहे.

संघटनेतील फुटीनंतर शिवसंग्राम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी मंत्री उदय सामंत यांच्यावर गंभीर आरोप केले यानंतर सामंत हे उदयकुमार आहेर यांच्या गटापासून अलिप्त राहतील असे अंदाज वर्तवले जात होते मात्र या सर्व चर्चांना पूर्णविराम देत सामंत हे आहेर यांच्या घरी पोहचले. यावेळी नाशिक शहरातील शिवसंग्रामचे प्रदेश सरचिटणीस विजय कातोरे, पदाधिकारी विलास पाटील, शेखरभैय्या देवरे, भूषण जोरवार, माजी नगरसेवक मधुकर हिंगमिरे, लाड शाखिय वाणी समाजाचे अध्यक्ष योगेश राणे, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पोटे, माधव बच्छाव, वाल्मीक चव्हाण, दादाजी अहिरे आदींसह शिवसंग्रामचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

उदयकुमार आहेर हे विनायक मेटे यांचे खंदे समर्थक मानले जात होते मात्र त्यांच्या निधनानंतर गटबाजी चव्हाट्यावर आली आणि आहेर यांना पदमुक्त केले. हे सर्व घडल्याने आहेर यांनी मोर्चेबांधणी करत जवळपास 25 जिल्ह्यातील पदाधिकारी यांना एकत्रित करत शिवसंग्राम आमच्या सोबत असल्याचा दावा केला येणाऱ्या काही दिवसात मेळावा देखील मुंबईमध्ये होणार आहे. यावेळी शिवसंग्राम कोणासोबत हे अधोरेखित होणार आहे.

आहेर यांच्या पत्नीचा देवळा नगरपंचायतीत पराभव झाल्याने त्यांनी राजकारण सोडले, राजकारणातून उदयकुमार संपले अशा चर्चा विरोधकांनी पेरल्या मात्र यावर आपली भूमिका स्पष्ट करत देवळा शहरातील निवडणुक शेवटची असल्याचे आहेर यांनी निवडणुकांच्या सभेत जाहीर वक्तव्य केले होते. स्थानिक राजकारणातून दूर झाले तरी राज्याच्या राजकारणात मात्र त्यांनी स्वतःला सिध्द करण्याचा प्रयत्न केला असून काही अंशी ते यशस्वी देखील होत आहेत. देवळा तालुक्यातील पराभवानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्ष प्रवेशाच्या ऑफर दिल्याची देखील चर्चा होती. तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ व उदयकुमार यांच्यात बैठका देखील झाल्या होत्या मात्र नंतर पक्षप्रवेश चर्चेला पूर्णविराम मिळाला.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आहेर पुन्हा सक्रिय होत त्यांचे पूर्वाश्रमीचे सहकारी मित्र उदय सामंत यांच्यासोबतच्या मैत्रीचा फायदा उचलत राज्य स्थरावर हालचाली सुरू केल्यात. देवळा तालुक्यातील राज्य स्थरावर स्वर्गीय डॉ दौलतराव आहेर यांचा दबदबा होता मात्र त्यानंतर राज्य पातळीचे नेतृत्व देवळा तालुक्यांत निर्माण झाले नाही. ही पोकळी उदयकुमार आहेर भविष्यात भरून काढतील का याकडे देखील तालुका वासियांचे लक्ष आहे. राज्यभर जनसंपर्क मैदान गाजवण्याची कला हे अवगत असले तरी कुठलेही सवैधानिक पद नसल्याने राज्य नेतृत्वाची उणीव मात्र नेहमी जाणवते. सामंत यांची मैत्री आहेर यांना राज्याच्या राजकारणात कुठपर्यंत पोचवते हे बघण महत्वाचे आहे.

कालची भेट ही कौटुंबिक भेट होती यात कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. स्व. विनायकराव मेटे साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमचा लढा सुरूच राहील. ही कौटुंबिक भेट असली तरी येणाऱ्या काळात शिवसंग्राम संघटना ही मेळावा घेवून आपली भूमिका स्पष्ट करेल, मी जुन्या जाणत्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की, आपणही सोबत यावे. आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मेटे साहेबांचे स्वप्न पूर्तीसाठी प्रयत्न करू.
उदयकुमार आहेर ( प्रदेशाध्यक्ष, युवक आघाडी )


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here