
राम शिंदे | सर्वतीर्थ टाकेद
नाशिक लोकसभा मतदार संघाचे खासदार आहात, सहा विधानसभा मतदार संघातून तुम्हाला मते मिळाली आहेत, केंद्रातून हवा तितका निधी आणून विकास करा, राज्य शासनाचा निधी आणि केंद्र सरकारचा निधी ह्यातला फरक समजून घ्या, आम्ही राज्यशासनाकडे पाठपुरावा करुन मंजूर करुन आणलेल्या विकास कामांचे श्रेय लाटण्याचा बालिशपणा खासदार गोडसेंनी करु नये असा टोला आमदार माणिकराव कोकाटे यांनी खासदार हेमंत गोडसेंना लगावला.

आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नांतून टाकेद गटातील मंजूर झालेल्या सुमारे 106 कोटी रुपयांच्या रस्त्यांचे भूमिपूजन शनिवारी (दि.19) दुपारी करण्यात आले. यावेळी पिंपळगावमोर येथे झालेल्या सभेत बोलताना आ. कोकाटे यांनी खासदार गोडसेंचा खरपूस समाचार घेतला.
यावेळी व्यासपिठावर माजी जि. प.सदस्य बाळासाहेब गाढवे, ज्येष्ठ नेते रतन पा जाधव, मा. रा. यु जिल्हा अध्यक्ष सुनील वाजे, पं. स उपसभापती पांडुरंग वारुंगसे, पिंपळगाव मोर सोसायटीचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ काळे, सरपंच हिराबाई गातवे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रतन पाटील जाधव ,गटनेते वसंत भोसले, धामणी सरपंच नारायण भोसले, भरविर सरपंच अरुण घोरपडे, भगवान जुंद्रे आदी उपस्थित होते.
प्रस्तावित पिंपळगाव मोर ते वासाळी फाटा रस्ता सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. अशोक चव्हाण असतांना मंजूर आहे तरीही ह्या रस्त्याचे श्रेय कसे काय खासदार लाटू शकतात ? असा सवाल उपस्थित करुन मागच्या पाच वर्षांत तुम्ही खासदार, आमदारही शिवसेनेचा, राज्यात आणि केंद्रातही तुमची सत्ता होती त्यावेळी हा रस्ता का नाही मंजूर केला ? केवळ चार दोन कार्यकर्ते हाताशी धरून जनतेची दिशाभूल करु नका, राज्य सरकारच्या बजेटमधील कामे आमदार प्रस्तावित करतात, केंद्राच्या बजेटची कामे खासदार प्रस्तावित करतात, ज्याला कायदा कळत नाही तो लोकप्रतिनिधी कसा ? असा सवाल उपस्थित करत आमच्या विकास कामांचे श्रेय लाटणे, विकास कामांमध्ये खोडा घालण्याचे उद्योग बंद करा अन्यथा पुढच्या खासदारकीला गाठ माझ्याशीच आहे असा सज्जड इशारा आमदार माणिकराव कोकाटे यांनी खासदार गोडसेंना दिला.
यावेळी बारी घाट (वासळी फाटा) ते पिंपळगाव मोर (98 कोटी 8 लक्ष),धामणगाव ते टाकेद (6 कोटी 69 लक्ष), बेलगाव तर्हाळे फाटा ते गांगडवाडी रस्ता(1 कोटी 40 लक्ष) आदी कामांचे भूमिपूजन आ. कोकाटेंच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास युवती तालुकाअध्यक्ष रुक्मिणी जोशी, गट नेते वसंत भोसले, माजी सरपंच गौतम भोसले, टाकेद सरपंच रतन बांबळे,दौलत बांबळे,श्रीराम लहामटे, संतोष वारुंगसे, दशरथ भोसले, ईश्वर भोसले, जगन बेंडकोळी, मुरलीधर गातवे, युवराज गातवे, नंदू काळे,महेश गाढवे, आदींसह परिसरातील पदाधिकारी व कोकाटे समर्थक उपस्थित होते.
एकाच व्यासपीठावर या आणि कळू द्या जनतेला:
तुमची इच्छा असेल तर एकाच व्यासपीठावर येऊन समोरासमोर बोला, लोकांनाही कळूद्या रस्त्याचे काम कोणी आणले कोणी पाठपुरावा केला असे कोकाटे यांनी खा. गोडसेंना आव्हान दिले. आगामी वर्षभरात उच्च गुणवत्तेचा रस्ता होणार असून विकासकामांत आडवे येणारांना कसे आडवे करायचे हे मला चांगलंच माहीत आहे हे खास शैलीत कोकाटे यांनी सांगितले.
राघोजी भांगरेंच्या स्मारकालाही खोडा
इगतपुरी तालुक्यातील प्रस्तावित राघोजी भांगरे स्मारक वासाळी येथे होणार असून गेल्या वर्षी स्मारकाचे भूमिपूजन देखील झालेलं आहे. खासदारांनी वासाळी ऐवजी सोनोशी जागेचे नव्याने पत्र देऊन कामात खोडा घालण्याचे काम केले, त्यामुळे स्मारकाचे काम एक-सव्वा वर्ष रखडले आहे. सोनोशीला जमीन उपलब्ध नसून शिल्लक जागा वनविभागाची असून खासदारांचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांनी फेटाळून लावला असून एकच स्मारक वासाळीफाटा येथेच होणार असल्याचे आमदार कोकाटेंनी सांगितले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम