मुंबई : राज्यात सध्या वेगवेगळ्या निवडणुकांचा माहोल आहे . नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. विद्यमान आ. डॉ. सुधीर तांबे यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. यासंदर्भात आज प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आज जाहीर केले.
डॉ. तांबे यांनी गेल्या काही दिवसांपासून भेटी गाठी वाढवला आहेत. गेली तीन टर्मपासून या मतदासंघाचे प्रतिनिधीत्व तांबे करत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे ते मेहुणे असल्याने त्यांचा उमेदवारीचा मार्ग मोकळा होता. पटोले म्हणाले विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका लागल्या आहेत. नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आहे तर अमरावती आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचा त्यात समावेश असून नाशिक पदवीधरमध्ये आ. डॉ. सुधीर तांबे हे आमचे उमेदवार असतील. इतर उमेदवार निश्चित झालेले नसून लवकरच जाहीर करू असे सांगीतले. सद्या स्थितीत शिक्षक व पदवीधर हे चारही मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत.
तांबे यांना प्रतिस्पर्धी कोण असेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे, या नाशिक पदवीधर मतदारसंघात नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. माजी मंत्री थोरात आणि आमदार तांबे यांचा शिक्षण संस्थांच्या माध्यमातून या पाच जिल्ह्यांत मोठा संपर्क आहे. तसेच, शिवसेनेचा फायदाही तांबे यांना होऊ शकतो. भाजपा कोणाला मैदानात उतरवते यावर सर्व अवलंबून असणार आहे.
या मतदारसंघासाठी भाजपचे नेते महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे पाटील यांचे नाव चर्चेत आहे. राजेंद्र विखे पाटील हे पुणे विद्यापीठाच्या सिनेटमध्ये तब्बल २० वर्षे होते. ते विद्यापीठाच्या व्यवस्थापन, विद्वावता, आणि सल्लगार परिषदेचे सदस्यही होते. त्यांचेकडे कामाचा दांडगा अनुभव आहे. लोणीतील प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठचे ते कुलपती म्हणून सद्या काम बघत आहेत. भाजपकने विखेंना उमेदवारी दिल्यास नगरमधील विखे-थोरात यांची प्रतिष्ठा पणाला लागेल.
भाजपकडे नाशिकचे भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष केदा आहेर देखील इच्छुक आहेत. भाजपशी एकनिष्ठ असलेले आहेर हे माजी मंत्री डॉ डी एस आहेर यांचे पुतणे आहेत. तर विद्यमान आमदार डॉ राहुल आहेर यांचे ते बंधू आहेत. नाशिक जिल्हा बँक, देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकार क्षेत्रात त्यांची चांगली पकड आहे. जिल्ह्यात जनसंपर्क चांगला असून कसमादे हा परिसर खानदेशात येत असल्याने जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिकचा कसमादे भागात त्यांना चांगले मताधिक्य मिळू शकते. यामुळे आहेर की विखे यावर नाशिक पदवीधर मतदार संघाचे भवितव्य अवलंबून असेल
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम