नाशिक : नाशिकचे जिल्हा रुग्णालय सतत विविध कारणांनी चर्चेत येत आहे. कधी बोगस प्रमाणपत्र प्रकरण, तर कधी रुग्णालयाच्या उपकरणात झालेला घोटाळा. आता ही प्रकरणे शांत झाली नसताना आणखी एक प्रकरणामुळे जिल्हा रुग्णालय पुन्हा चर्चेत आलेला आहे. येथील वरिष्ठ लिपिकाने वैद्यकीय बिल मंजूर करण्याच्या मोबदल्यात ३० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.
राजेश सुधाकर नेहुलकर असे या लाचखोर लिपिकाचे नाव असून, न्यायालयाने त्यास एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या १० ऑगस्ट रोजी सदर तक्रारदाराने आपल्या पत्नीच्या आजारपणाचे दोन वैद्यकीय बिल मंजुरीसाठी जिल्हा रुग्णालयात दिले होते. पण ही वैद्यकीय बिले मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात लिपिक नेहुलकर याने या बिलांच्या रकमेच्या पाच टक्के प्रमाणे ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी सुरुवातीला केली होती. अखेर तडजोडीअंती तक्रारदाराने नेहुलकरला २४ हजार रुपये देण्याचे मान्य केले होते.
यासंदर्भात सदर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. मात्र नेहुलकर यास लाचलुचपतकडे करण्यात आलेल्या तक्रारीची माहिती मिळाल्याने तो काही दिवसांपासून रजेवर जाऊन नुकताच रुजू झाला होता. यावेळी विभागाच्या पथकाने सापळा रचत त्याला लाच घेताच रंगेहाथ पकडण्यात आले. पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे,पोलीस उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, हवालदार पंकज पळशीकर, पोलीस नाईक प्रभाकर गवळी, नितीन कराड, प्रवीण महाजन, संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
नेहुलकर यास सोमवारी (दि. ३) न्यायालयात हजर केले असता त्यास एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वीही तक्रारदाराने नेहुलकर याची तक्रार रुग्णालयातील वरिष्ठांकडेही केली होती, मात्र त्यावर ठोस कारवाई केली नाही. अखेर त्याने मुंबईत तक्रार केल्यानंतर नेहुलकरविरोधात ही कारवाई झाली. दरम्यान, लिपिक नेहुरकर यास याआधीही अहमदनगरला कार्यरत असताना लाचेच्या आरोपाखाली कारवाई झाली होती. त्यानंतर कारवाई म्हणून त्याच्या वेतनात कपात करून नाशिकला बदली केल्याचे सांगितले जात आहे.
मोठे रॅकेट उघड होणार
दरम्यान, या कारवाईदरम्यान झालेल्या चौकशीत नेहुरकर याने या प्रकरणात एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचे सांगितले आहे. तसेच यात वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व शिपाई यांची टक्केवारी ठरलेली असतात. त्यामुळे ही सर्व बिले शिपायाच्या घरी नेऊन, टक्केवारी देऊन मगच ती बिले संबंधिताना दिली जातात. त्यामुळे यासंबंधी अनेक तक्रारी दाखल असूनही ह्यांच्यावर अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आलेली नव्हती. मात्र, या कारवाईमुळे इथल्या लाचखोरीचे मोठे रॅकेट उघड होणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम