नाशिक : मला रोहित शेट्टीच्या सिंघम चित्रपटात एक छोटासा रोल होता. पण तो जो रोल होता, तो एक महत्वाचा होता. म्हणून कोणताही रोल हा छोटा किंवा मोठा आहे हे महत्वाचे नाही, तर त्या रोलचे अस्तित्व माझ्यासाठी महत्वाचे होते. म्हणून हा रोल माझा आवडता रोल आहे, असे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी रसिकांसमोर व्यक्त केले आहे.
रविवारी (दि. २५) ज्योती स्टोअर्स व शंकराचार्य न्यास यांच्या वतीने आयोजित “लेखक तुमच्या भेटीला” या कार्यक्रमांतर्गत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या ‘मी बहुरूपी’ या पुस्तकाच्या निमित्ताने ही मुलाखत रंगली होती. यावेळी प्रख्यात नाट्य-सिने अभिनेते विनय येडेकर हेदेखील उपस्थित होते. गंगापूर रोड येथील कुर्तकोटी सभागृहात हा कार्यक्रम आयोजित झाला होता.
यावेळी अशोक सराफ यांनी या पुस्तकाबद्दल बोलताना म्हटले, ‘मी बहुरूपी’ हे पुस्तक मी लेखक म्हणून नाही, नट म्हणून लिहिले आहे. माझ्या मागील वर्षांच्या ५० कालावधीत मला भेटलेले लोक, आलेले अनुभव यांच्या आठवणी मी त्यात सांगितल्या आहेत. यामुळे ‘मी बहुरूपी’ हा माझ्या आठवणींचा संग्रह आहे. तसेच मीना कर्णिक यांनी केलेले शब्दांकन व ग्रंथाली प्रकाशनाने त्याची देखणेपणाने केलेली निर्मिती, यामुळे हे पुस्तक प्रेक्षणीय आणि वाचनीय झाले आहे.
यावेळी मुलाखतीच्या सुरुवातीला त्यांनी नाशिकबद्दल व कविश्रेष्ठ वि.वा. शिरवाडकर, ज्येष्ठ नाटककार प्रा. वसंत कानेटकर, ज्येष्ठ समीक्षक माधव मनोहर व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ या नाशिकच्या चार व्यक्तीचे अनन्यसाधारण महत्त्व असून, यांनी आयुष्यात मला बरेच काही दिले असल्याचे गौरावौद्गर काढले होते. तसेच, त्यांनी ह्या मुलाखतीतून अनेक किस्से व अनेक आठवणींना उजाळा दिला.
ज्यात त्यांनी अनेक चित्रपट, लक्ष्मीकांत बेर्डे व सचिन पिळगावकर यांच्या आपल्या मैत्रीसंबंधाना उजाळा दिला. तसेच, एका भोजपुरी चित्रपटात काम करतानाचा किस्सा सांगताना ते म्हणाले, चित्रपटात कुठलीही भाषा बोलत असताना डोळे हे महत्वाचे असते. त्यामुळे अभिनयात डोळ्यांचा वापर तुम्ही कसा करता हे महत्त्वाचे असून एखादा प्रसंग सुरुवातीला तुम्हाला डोळ्यातून व्यक्त करता आला पाहिजे. तसेच, त्यांनी अभिनय ही गोष्ट शिकून येत नाही, तो गुण तुमच्या अंतर्गतच असावा लागतो. अभिनयामध्ये वैविध्यता झाले नाही असे होतच नाही. दाखविण्याची कला मी मामा गोपीनाथ सावकार यांच्याकडून शिकलो.
यावेळी विनय येडेकर यांनी अशोक सराफ यांच्याबद्दल बोलताना शासनाकडून अद्यापही त्यांच्या कार्याचा गौरव न केल्याबद्दलची खंत बोलून दाखवली. तसेच ते एक शिस्तबद्ध व्यक्तिमत्व असून मामांमुळे माझ्या अभिनयात शिस्त लागली असल्याचे म्हटले.
मुलाखत विजय निपाणे यांनी घेतली आहे. तत्पूर्वी, अशोक सराफ यांच्या जीवनप्रवासाविषयीची एक चित्रफीत दाखविण्यात आली. यावेळी मंचावर अभिनेते विनय येडेकर, ग्रंथालीच्या संचालक धनश्री धारप आदी मान्यवर उपस्थित होते. ज्योती स्टोअर्सचे संचालक वसंत खैरनार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम