नाशिक – सिटीलिंकला गेल्या आर्थिक वर्षात २० कोटी रुपयांचा तोटा झाल्यामुळे हा तोटा भरून काढण्यासाठी सिटीलिंकने आपल्या प्रवासी पासच्या दरात मोठी वाढ केली आहे.
बुधवारी नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. त्यावेळी मनपा आयुक्त व कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ही दरवाढ केली आहे. तसेच, ह्या बैठकीत कंपनीच्या गत आर्थिक वर्षाचा ताळेबंद अहवाल सादर करण्यात आला होता.
अहवालानुसार गेल्या आर्थिक वर्षात सिटीलिंकला तब्बल २० कोटी २१ लाख रुपयांचा तोटा झाला आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी उपाय म्हणून ओपन एंडेड पासेस म्हणजे विशिष्ट दिवशी किंवा महिन्यात सवलतीने मुक्त प्रवास करणाऱ्या पासच्या शुल्कात दहा ते बारा टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे, सिटीलिंकचा प्रवास जरी महागणार असला तरी ती वाढ नियमित भाड्यात होणार नाही. तसेच विद्यार्थी आणि कामगारांच्या पास शुल्कात कोणतीही वाढ करण्यात आली नाही, असे स्पष्टीकरण कंपनीचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहेत.
तसेच प्रवाश्यांना अधिक अचूक वेळेवर सेवा देणे, अॅपवरील रिअल टाइम बससेवा वेळेत दिसेल अशा पध्दतीने नियोजन करण्याचे निर्देश दिले. राज्य महामंडळाची मालकी असलेल्या निमाणी बसस्थानकाचे वीजबिल व अन्य किरकोळ दुरुस्त्यांचा खर्च सिटीलिंकच्या माध्यमातून केली जाणार असल्याचाही निर्णय घेण्यात आला. यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांची कंपनीच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अशी असेल सुधारित पासचे दर :
नव्या दरानुसार, आता एक दिवसाचा पास ७५ रुपयांवरून १०० रुपये, तीन दिवसांचा पास २०० वरून २५० रुपये, सात दिवसांचा पास ५०० वरून ५५० रुपये तर एक महिन्याचा पास १५०० रुपयांवरून २००० रुपये अशी वाढ करण्यात आली आहे. ही वाढ १ ऑक्टोबरपासून होणार आहे. मात्र, विद्यार्थी व कामगार यांच्यासाठीच्या मासिक पास सवलतीमध्ये कुठलीही वाढ करण्यात आली नाही.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम