नाशिक – शहरातील अंबड परिसरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना वाढत असून त्यातच परिसरातील गुंडांच्या दहशतीने तिथले नागरिक भयभीत झाले आहे. नुकतीच परिसरात दोन गटांमध्ये हाणामारी व दगडफेकीची घटना घडली आहे.
घटना अशी आहे, परिसरातील दत्तनगर येथे १५ ते २० जण हातात दांडके घेऊन सुरुवातीस एकमेकांशी भिडले व नंतर अनेकांच्या घरात त्यांनी दगडफेक केली. याप्रकरणी दोन्ही गटातील गुंडांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हिडियो व्हायरल झाल्यानंतर प्रथमदर्शनी हा दहशत माजवण्याचा प्रकार वाटला होता. मात्र, ह्या दोन्ही गटांमध्ये कौटुंबिक वर्चस्वाच्या वादातून हाणामारी झाली असल्याचे नंतर स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलिसांनी अंकेश सिंग, मिंदु राजपूत, भगवान यादव व अनेकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत असल्याचे अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भागीरथ देशमुख यांनी सांगितले.
यावेळी सामजिक कार्यकर्ते साहेबराव दातीर म्हणाले, आम्ही परिसरातील गुंडगिरीबाबत पोलिसांना वारंवार सांगितले होते. मात्र त्यांना याचे गांभीर्य वाटत नाही. पोलिसांनी ह्या दहशत माजवणाऱ्यांवर योग्य कारवाई न झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम