पुणे – शहरातील मुंढवा परिसरातील केशवनगर भागात एका बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू असताना डक्टच्या जाळीत पडलेले हेल्मेट काढण्यास निघालेल्या कामगाराचा पाचव्या मजल्यावरून कोसळून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हर्षित बिस्वास असे या मृत कामगाराचे नाव आहे.
याप्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात सदर इमारतीचा बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर गुन्हा दखल झाला आहे. २९ जून रोजी ही घटना घडल्यानंतर मृत कामगाराची पत्नी व परिवार त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कारासाठी गेले होते, तिथून परतल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत बिस्वास हा पश्चिम बंगालमधील असून तो या इमारतीत मजुरीचे काम करत होता. केशव नगर येथे व्यंकटेश ग्राफिटी ग्लोवर या इमारतीच्या बी विंगचे काम सुरू होते. तिथे तो सेंट्रींगचे काम करत होता. त्याच्याकडे हेल्मेट होते. पण, ते पाचव्या मजल्यावरील डक्टच्या जाळीवर पडले. त्यामुळे तो दुपारी जेवणासाठी खाली येताना त्याने पाचव्या मजल्यावरील डक्टमधील हेल्मेट काढण्याचा प्रयत्न केला. हेल्मेट काढण्यासाठी त्याने सुरक्षा जाळीवर पाय ठेवला आणि त्या जाळीची पिल्लरला बांधलेली दोरी तुटली. त्यामुळे तो पाचव्या मजल्यावरून खाली कोसळला. यात गंभीर मार लागल्याने हर्षित याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
याप्रकरणात मुंढवा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तपास आणि तक्रारदारांनी दिलेल्या माहितीनंतर बिल्डर व कॉन्ट्रॅक्टर यांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यानुसार पोलीसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम