मुंबई: ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील’ या एका वाक्यामुळे रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आलेले सांगोला मतदारसंघाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी आपले बंड हे शिवसेनेच्या भल्यासाठीच असल्याचा दावा केला आहे. मला इतकंच कळतं की, आमची ही स्वार्थाची लढाई नाही. पण आम्हाला बंडखोर वगैरे बोललं जात आहे, हे बरोबर नाही. संजय राऊत यांच्यासारखे लोक आमच्या वैचारिक लढाईला बदनाम करत आहेत. पांडुरंगा शप्पथ सांगतो, ही वैचारिक लढाई आहे. आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी लढणारी माणसं आहोत. आमची लढाई ही शिवसेना पक्ष वाचवण्यासाठी आहे. आम्ही शिवसेना संपवण्याचं पाप कधी करणार नाही, असे शहाजी बापू पाटील यांनी म्हटले. एबीपी माझा वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
यावेळी शहाजी बापू पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाचे गोडवे गायले. एकनाथ शिंदे हे आमचं नेतृत्त्व करत आहेत, ते कणखर नेते आहेत. मुख्यमंत्री म्हणून ते महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करतील, असा विश्वास शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केला. शहाजी बापू पाटील यांनी आपल्या खास शैलीत महाराष्ट्रातील धक्कादायक घटनांनी भरलेल्या राजकारणावरही भाष्य केले. माझ्या भाषेत सांगायचं तर मी म्हणेन की, काय ते मुंबईचा सागर बंगला, काय ते सागर बंगल्यातला देवांचा देव देवेंद्र, काय त्याने दिला आम्हाला महाराष्ट्राचा एक कणखर मुख्यमंत्री, ओक्केवाला महाराष्ट्र.
एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी रात्री राजभवनात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे गोव्याला रवाना झाले होते. त्याठिकाणी एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांची भेट घेतली होती. यानंतर एकनाथ शिंदे गटातील सर्व आमदार शुक्रवारीच मुंबईत परतण्याची शक्यता आहे. दरम्यान, विधानसभेत शनिवारी होणारी बहुमत चाचणी लांबणीवर पडली आहे. उद्या होणार विशेष अधिवेशन आता ३ आणि ४ जुलै रोजी होणार आहे. त्यावेळीच बहुमत चाचणी पार पडेल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम