द पॉईंट नाऊ ब्युरो : महाराष्ट्रात असणारे महाविकास आघाडी सरकार बरखास्त होणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. आधी आदित्य ठाकरे यांनी आपल्या नावासमोरील मंत्रिपदाचा उल्लेख हटवला आणि त्यानंतर संजय राऊत यांचे ट्विट.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी जवळपास 25 हुन अधिक आमदारांना सोबत घेऊन सुरत गाठत आधी महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला. त्यानंतर त्यांना मनवण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. संजय राऊत यांनी आमचे आमदार परत येतील म्हणून देखील अनेक वेळा सांगितले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांसमोर वेगवेगळ्या अटी ठेवल्या. ज्यात शिवसेनेने भाजपसोबत सत्ता स्थापन करावी ही प्रमुख मागणी केली. मात्र मुख्यमंत्र्यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, आता खुद्द संजय राऊत यांनीच ‘महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने’ असे ट्विट करून जवळपास महाविकास आघाडी सरकार पडणार हे निश्चितच केले. याआधी आदित्य ठाकरे यांनी आपल्या नावासमोरील मंत्रिपद हटवले. यामुळे राजकीय गोटात अनेक तर्क वितर्क, चर्चा, अंदाज वर्तवले गेले.
मात्र आता महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याने, हे सरकार पडणार हे निश्चित असल्याचे दिसून येत आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील लवकरच राजीनामा देणार असल्याचे बोलले जात आहे.
आता पुढे शिवसेना नेमके काय पाऊल उचलते? भाजपसोबत सत्ता स्थापन करते की नाही? की मग राज्यात मध्यावर्ती निवडणुका लागणार हे लवकरच स्पष्ट होईल, असे संकेत मिळत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम