शिवसैनिक नसते तर मी रात्री संपलो असतो ; हल्ल्यातून बचावलेले सेनातालुका प्रमुख गहिवरले

0
155

नाशिक प्रतिनिधी : सेनेची राज्यात सत्ता असून देखील तालुका प्रमुखांना उपोषणाला बसावे लागते व त्यांच्यावर जीवघेणा हल्ला होतो. ही परिस्थिती चिंताजनक असून या घटनेने खळबळ उडाली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास बागलाण तालुका पंचायत समिती येथे ताहाराबाद येथील कथीत भ्रष्टाचार प्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या शिवसेनेचे बागलाण तालुका प्रमुख सुभाष नंदन यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ताहाराबाद ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरणी दोषी ठरवलेल्या अधिकारी, सरपंच व सत्ताधारी सदस्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी शिवसेनेचे बागलाण तालुका प्रमुख सुभाष नंदन हे 22 मार्चपासून बागलाण पंचायत समिती येथे उपोषणास बसले आहेत. नंदन न्यायाची अपेक्षा करत असतांना त्यांच्यावर झालेला हल्ला हा निंदनीय असून मध्यरात्री 12 : 00 वाजेच्या सुमारास नंदन व त्यांच्या सहकाऱ्यांवर हल्ला चढवला. यात सुभाष नंदन तर बचावले मात्र त्यांचे सहकारी जखमी झालेले आहेत. सदर प्रकार हा बागलाण पंचायत समिती चे गट विकास आधिकारी कोल्हे व विस्तार आधीकारी सुर्यवंशी व सावंत यांच्या समोर घडल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री 3 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, हा हल्ला करणाऱ्यांमध्ये प्रशांत सोनवणे, भाऊसाहेब नांद्रे, सरपंच शीतल नंदन यांचे पती योगेश नंदन व काही अज्ञातांचा समावेश असल्याचा आरोप नंदन यांनी केला आहे.

बागलाण तालुक्याच्या ताहाराबाद येथील ग्रामपंचायतीत सात विकासकामांमध्ये शासनाने ठरवून दिलेले नियम धाब्यावर बसवून लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचे पुरावे समोर आले होते. त्यातील दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नंदन उपोषणास बसले आहेत. यादरम्यान त्यांच्यावर हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. आता दोषींवर काय कारवाई होते, यांची सगळे वाट बघत आहेत.

लोकशाही मार्गाने उपोषण करतोय मात्र रात्री गुंडांनी हे उपोषण उधळून लावण्याचा प्रयत्न केला आहे, काठ्या , टॉम्याच्या साह्याने मारण्याचा प्रयत्न केला मात्र माझ्या शिवसैनिकांनी मला वाचवले. हा निंदनीय प्रकार असून प्रशासनाने कठोर कारवाई करावी उद्या ताहराबाद बंदची हाक दिली असून गुंडांना धडा शिकवु.
सुभाष नंदन , तालुका प्रमुख शिवसेना

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here