द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : देश विज्ञानाच्या आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे तरी देखील आजही आपल्या देशात पतीच्या निधनानंतर पत्नीने सर्व शृंगार म्हणजेच कुंकू पुसणं, गळ्यातील मंगळसूत्र काढणं, हातातील बांगड्या फोडणं, पायातली जोडवी काढून ठेवण यासारख्या प्रथा अजूनही अस्तित्वात आहेत.
या अनिष्ट प्रथांवर बंदी घालण्याचा निर्धार कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने घेतला. हेरवाड ग्रामपंचायतीने हा निर्णय घेऊन राज्यासमोर आदर्श ठेवला. ह्याच आदर्शाला डोळ्यासमोर ठेवत आता राज्यभरात विधवा प्रथा बंदी असा मोठा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. हेरवाड ग्रामपंचायतीच्या या ठरावाचे रूपांतर आता शासन निर्णयात झाले आहे.
महाराष्ट्रातील पहिले उदाहरण
विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय शासनाकडून आल्यानंतर महाराष्ट्रातील पहिलं उदाहरण समोर आलं आहे. नाशिकात राहणाऱ्या सुगंधाबाई चांदगुडे यांनी पतीच्या निधनानंतर तब्बल तेरा वर्षांनी पायात जोडवे आणि कपाळाला कुंकू लावत पुन्हा शृंगार केला.
सुगंधाबाई चांदगुडे कोण?
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत जातपंचायत यांच्या विरोधी चळवळ उभी करणारे नाशिकच्या इंदिरानगरमध्ये राहणारे कृष्णा चांदगुडे यांच्या ७६ वर्षीय आईने परंपरेची आणि समजाची ही चौकट ओलांडली आहे. कृष्णा चांदगुडे हे मूळ अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील रहिवाशी आहेत. त्यांचे वडील त्र्यंबकराव चांदगुडे हे शेतकरी होते. तेरा वर्षांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या पत्नी सुगंधाबाई यांनी सर्व शृंगार उतरविला.
कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा महिलांसाठी एक निर्णय घेतला त्यानंतर पतीच्या निधनानंतर स्त्रीने बांगड्या फोडणे जोडवे आणि अलंकार काढून घेणे यासारख्या प्रथा बंद करण्याचा ठराव केला. या निर्णयाला शासनाने अनुमती दिल्यानंतर कृष्णा चांदगुडे यांनी आपल्या वडिलांच्या निधनानंतर तब्बल १३ वर्षांनी विधवा आईला जोडावे घालून, कुंकू लावत तिला मंगळसूत्रही घालण्यास दिले.
परिवर्तनाला सुरुवात आपल्या घरातून व्हायला हवी, यामुळे आपण हे पाऊल उचलले असे कृष्णा चांदगुडे हे अभिमानाने सांगतात.
समाजातील अशा प्रथा थांबविण्यासाठी माझा मुलगा अंधश्रद्धा निर्मुलनाचे काम करतो. आमच्या घरात आम्ही अनेक सुधारणावादी निर्णय घेतले आहेत.आपल्या घरापासून त्याची सुरुवात करावी म्हणजे समाजात चांगला संदेश जातो. विधवा असल्याने दुय्यम दर्जा मिळतो असतो. पण आज आनंद होतो आहे. अशा प्रकारे सर्वानी आदर्श घ्यावा आणि समाजात परिवर्तन घडवून आणावे असे मतं सुगंधाबाई त्र्यंबक चांदगुडे व्यक्त करतात.
शासनाने यावर परिपत्रक काढले त्यानंतर कृष्णा चांदगुडे यांनी विधवा आईसते परिपत्रक दाखवत त्यावर लगेचच सुगंधाबाई चांदगुडे यांनी ही सुधारणा स्विकारली. सुगंधाबाई यांच्या या निर्णयाची पूर्ण नाशिकबरोबरच सर्व राज्यात चर्चा होत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम