नाशिक : शहरात स्मार्ट सिटीकडून जुने नाशिक आणि गावठाण भागात घेण्यात आलेल्या ‘ट्रायल रन’च्या मुद्द्यावरून सुरू झालेला गोंधळ सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये थेट हमरीतुमरीवर येऊन पोहोचला आहे. नाशिक महापालिकेच्या नियमित महासभेत महापौर सतीश कुलकर्णी आणि विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक उडाली.
स्मार्ट सिटीसंदर्भात सुरू असलेल्या कामावरून स्वत: महापौरच टीका करत असताना विरोधी पक्ष आक्रमक झाला. ‘तुम्ही सत्तेत असताना टीका का करता? त्यापेक्षा कारवाई करा,’ अशी मागणी विरोधी पक्षाने केली आणि याच मागणीवरून अजय बोरस्ते आणि महापौर सतीश कुलकर्णी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. ‘ट्रायल रन’ बाबत थेट महापौरांनी व्यक्त केलेली हतबलता ही आश्चर्यकारक आहे. ‘ट्रायल रन’मुळे संपूर्ण वाहतुकीचा फज्जा उडालेला असताना सत्ताधारी हतबलता व्यक्त करत आहेत. त्यांनी सरळ राजीनामा द्यावा, अशी आक्रमक भूमिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी घेतली.
नेमका काय आहे वाद?
रविवार कारंजा, निमाणी चौकसारख्या वर्दळीच्या ठिकाणी स्मार्ट सिटी अंतर्गत जंक्शन तयार करण्याच्या कामासाठी स्मार्ट सिटी कंपनीने सुरू केलेले ट्रायल रन परिसरातील व्यापारी, वाहनधारकांसाठी चांगलीच डोकेदुखी ठरले आहे. रविवार कारंजा परिसरातील वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी जुन्या यशवंत मंडईच्या जागेत बहुमजली वाहनतळ उभारण्याचा प्रस्ताव मंजूर असताना, जंक्शन तयार करण्याच्या नावाखाली या चौकातील वाहतूक बेट आणखी रूंद करून वाहतूक कोंडीचा प्रश्न वाढविण्याचाच प्रयत्न होत असल्यामुळे परिसरातील व्यापारी रस्त्यावर उतरले आहेत. स्मार्ट कंपनीविरोधात व्यापाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. विशेष म्हणजे दहीपूल, मेनरोड, धुमाळ पॉइंट रस्त्याचा वाद कायम असताना ‘ट्रायल रन’साठी स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घेतलं गेलेलं नाही. त्यामुळे व्यापारी, नागरिकांबरोबरच स्थानिक नगरसेवकांनी देखील या ‘ट्रायल रन’ विरोधात दंड धोपटले आहे. त्याचे पडसाद आजच्या महासभेत उमटले आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम