नाशिक : नाशिक-पुणे प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या रेल्वे मार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादनाची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. राज्य आणि केंद्र शासनाने यापूर्वीच प्रकल्पाला मान्यता दिली आहे. मात्र, केंद्राची अंतिम मान्यता मिळाली नसल्याने प्रकल्पाचे काम सुरू झालेले नाही. हा प्रकल्प त्वरित पूर्ण होण्यासाठी केंद्राने तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी आज (शुक्रवार ता.१७) संसदेत केली.
देशातील विविध राज्यांमध्ये रेल्वेचे जाळे वाढण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. खासदार गोडसे यांनी केलेल्या मागणीवर आम्ही लवकरच चर्चा करून नाशिक-पुणे प्रस्तावित रेल्वेमार्गाच्या प्रस्तावाविषयी सकारात्मक निर्णय घेवू अशी ग्वाही रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. सर्वेक्षणासाठी तीन वर्षांपूर्वी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. यातून सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. गोडसे यांच्या प्रयत्नांमुळे रेल्वेबोर्ड तसेच राज्य सरकारने नाशिक-पुणे रेल्वेमार्गाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. या मार्गासाठी साडे सोळा हजार कोटी रुपये खर्च येणार असून, राज्य व केंद्र शासन प्रत्येकी साडेतीन हजार कोटी (प्रत्येकी वीस टक्के) निधी देणार आहे. उर्वरीत साठ टक्के निधी म्हणजचे नऊ हजार कोटी रुपयांचा निधी हा इक्विलिटीतून उपलब्ध होणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम