द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (नाशिक) : नाशिक महापालिका निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे राजकीय मंडळी प्रचाराच्या कामाला लागली आहे. मात्र प्रभाग क्रमांक ७ मधील मतदार वर्ग सध्या पाण्याच्या गंभीर समस्येने त्रस्त झाला आहे.
नाशिक महापालिकेचा प्रभाग क्रमांक ७ हा श्रीमंत आणि उच्चभ्रू लोकांची वसाहत म्हणून ओळखला जातो. त्यात आजी/माजी लोकप्रतिनिधींचा या भागात अधिवास आहे. मात्र तरी देखील या भागातील मंगल नगर, लोकमान्य नगर मध्ये भर उन्हाळ्यात पाण्याची समस्या भेडसावत असल्याने, नागरिक त्रस्त झाले आहेत.
या समस्येमुळे आधी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी पाच वर्ष काय केले? असा सवाल नागरिक करू लागले आहेत. निवडणुकीच्या आधी अनेक आश्वासनांची गाजरं दाखवणं हे राजकीय मैदानात नेहमीच होत असतं. त्यात मतदारवर्ग मोठ्या विश्वासाने या लोकप्रतिनिधींना निवडून देतो. मात्र इथे प्रभाग क्रमांक ७ मध्ये नागरिकांना संताप अनावर झाला आहे.
प्रभाग क्रमांक ७ मध्ये आमदार देवयानी फरांदे, आमदार डॉ. राहुल आहेर, बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे, माजी केंद्रीय मंत्री आणि शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील या राजकीय क्षेत्रातील दिग्गजांसह विविध क्षेत्रातील नामवंत या भागात राहतात. मात्र तरी देखील या भागात पाण्याच्या समस्येने भेडसावणे याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या एवढ्या मान्यवरांच्या एक प्रकारच्या अधिवास कवच कुंडलांनंतर देखील या भागाला अशा समस्येने ग्रासले आहे याची नागरिक खंत व्यक्त करत आहेत.
80 टक्के राजकारण आणि 20 टक्के समाजकारणाच्या बतावण्या करून निवडून आलेले अजय बोरस्ते, छत्रपतींचा आशीर्वाद, सबका साथ सबका विकास म्हणत नागरिकांना आपल्याकडे वळवणाऱ्या स्वाती भामरे, हिमगौरी आडके आणि योगेश हिरे अशा इथल्या लोकप्रतिनिधींना देखील ही समस्या सोडवता येऊ नये. यावर नागरिक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
विशेषतः कांचनगंगा, दर्शन, कलानगर, इंद्रायणी अपार्टमेंट या भागात केवळ तासाभरापूरता आणि तोही अपूर्ण पाणीपुरवठा होत असल्याने, या लोकप्रतिनिधींच्या आश्वासनांचं काय झालं म्हणून नागरिक सवाल उपस्थित करत आहेत.
इथल्या या चारही लोकप्रतिनिधींना वारंवार पाण्याच्या समस्येबाबत याचना करूनही त्यावर काही पाऊल उचलले गेले नाही. यामुळे इथला मतदार वर्ग नाराज झाला आहे. आता निवडणुका येऊन ठेपल्यात. त्यात आता हे लोकप्रतिनिधी मतांची याचना करायला येतीलच. मात्र यावेळी जाब विचारून नाही, तर मत नाकारून त्यांना नागरिकांच्या समस्यांचं गांभीर्य लक्षात आणून देण्याचा इशारा मतदारांनी दिला आहे.
सध्या नगरसेवक म्हणून जरी यांचे अधिकार संपुष्टात आले असले, तरी आपल्या ऋणानुबंधांचा वापर करून हे लोकप्रतिनिधी नक्कीच समस्या सोडवू शकतात. अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. आता यावर इथले लोकप्रतिनिधी आता काही पाऊल उचलणार का? याकडे लक्ष लागले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम