नाशकात ज्येष्ठ नागरिकांकरिता जागरूकता व प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात

0
65

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी; नाशिक येथे दि २७ नोव्हेंबर २०२१ रोजी वात्सल्य वृद्धाश्रमच्या जवळ ज्येष्ठ नागरिकांकरिता जागरूकता व प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते करण्यात आला. सामाजिक जबाबदारी म्हणून नाईलिट या केंद्र शासनाच्या संस्थेतर्फे प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम सुरु करण्यात आला असून नाशिक जिल्ह्यामध्ये याची सुरुवात होत आहे.

याप्रसंगी खासदार हेमंत गोडसे, नगरसेवक हेमंत शेट्टी व किशोर सोनवणे, कार्यकारी संचालक डॉ. संजीव कुमार गुप्ता, आणि वात्सल्य वृद्धाश्रमाचे सतीश सोनार आदि मान्यवर उपस्थित होते. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत गोडसे याप्रसंगी सामान्यांसाठी बनविलेल्या कायद्यांचा जोपर्यंत कोणी लाभ घेत नाही तोपर्यंत कायदे निरर्थक असल्याचे सांगितले. या प्रशिक्षणाच्या अनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांकरिता उपलब्ध असलेल्या राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. ह्या अत्यंत उपयोगी अश्या प्रशिक्षण आणि जागरूकता कार्यक्रमाचा लाभ सर्व ज्येष्ठ नागरिकांना मिळेल आणि त्यांचे जीवनमान सुरळीत होण्यास या प्रशिक्षणाचा नक्की फायदा होईल असे प्रतिपादन त्यांनी केले. प्रशिक्षणाचा उपयोग ज्येष्ठ नागरिकांचे एकाकीपण कमी करण्यासोबत त्यांना नवीन तंत्रज्ञानाबाबत सक्षम करण्यासाठी देखील होणार आहे असे त्यांनी सांगितले.

डॉ. संजीव कुमार गुप्ता, कार्यकारी संचालक, नाईलिट औरंगाबाद यांनी ह्या प्रशिक्षण आणि जागरूकता कार्यक्रमाची आवश्यकता विषद करून या प्रशिक्षणात समाविष्ट असलेल्या विषयांसंबंधी तपशीलवार सांगितले. उपस्थित ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधताना उपस्थितांपैकी बऱ्याच जणांनी त्यांचे शंकासमाधान करून घेतले. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे बरीच कामे विनासायास होऊ शकतात आणि संपर्क ठेवण्यात सहजता येते याबद्दल त्यांची खात्री पटली. हे नवीन तंत्रज्ञान, कोणत्याही प्रकारचा संकोच न करता आपला छंद जोपासण्यात सहाय्यक ठरू शकते असे ते म्हणाले. डॉ गुप्ता यांच्या प्रत्येकासोबत संवाद साधण्याच्या कौशल्याने या सत्रामध्ये सर्व उपस्थितांनी हिरीरीने सहभाग नोंदविला.

सर्व उपस्थितांनी डॉ गुप्ता यांना प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आणि प्रसार करण्याचे वचन दिले. उपस्थित नगरसेवक हेमंत शेट्टी ,किशोर सोनवणे यांनी भविष्यात या प्रकल्पासाठी कोणत्याही प्रकारचे सहकार्य करण्याची तयारी दाखवली.
सतीश सोनार यांनी सर्व उपस्थित आणि मान्यवरांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here