जिल्हा बँकेचा ‘रणसंग्राम’ रंगणार ; इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू, निवडणुकांना सहकार विभागाची परवानगी

0
16

द पॉईंट प्रतिनिधी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाच वर्षानंतर पुन्हा जिल्हा बँकेचे रणांगण पेटणार आहे. नाशिक जिल्हा बँकेमध्ये संचालकांच्या 21 जागा आहेत.

नाशिक : फेब्रुवारीमध्ये निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्यासाठी  ठरावाचा कार्यक्रम अर्ध्यावरच स्थगित झाला होता. यामुळे इच्छुकांचा हिरमोड झाला होता. कोरोनाचा जोर ओसरल्याने निवडणुकीचा कार्यक्रम राबविण्यास सहकार विभागाने परवानगी दिली आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यात जिल्ह्याचे रणांगण पून्हा पेटणार असून राजकारणात एक नवी रंगत येणार आहे.

नाशिक जिल्हा बँकेत आजी-माजी आमदार-खासदारांसह नेते जिल्हा बँकेत संचालक होण्यासाठी सर्वस्व पणाला लावतात. घोडेबाजार मोठ्या प्रमाणात होतो. यामुळे रंगीला मतदारांची ‘चांदी’ तर उमेदवारांची ‘धाकधूक’ जोरात असते. सोसायटी गटात तर लाखो रुपयांची उलाढाल होते, यामुळे जिल्हा बँक निवडणूक  राजकीय क्षेत्रातील सगळ्यांचे लक्ष वेधून घेते. गेल्या वर्षी मतदार यादीसाठी संस्था प्रतिनिधीचे ठराव मागविण्यात आले होते. मात्र कोरोणामुळे ही प्रक्रिया अर्धवट राहील्याने पुन्हा या वर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात ठराव मागविण्यात आले होते. 22 फेब्रुवारीपर्यंत सहकारी संस्थांच्या प्रतिनीधीचे ठराव सहायक निबंधकांकडे द्यायचे होते. 2 मार्चला जिल्हा बँक प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करणार होती. त्यामुळे ठराव करण्यासाठी गावचे राजकारण देखील तापले होते. त्यातच तिसऱ्या लाटेची चाहूल लागताच सहकार विभागाने निवडणूक प्रक्रिया स्थगित केली. पुन्हा आता तिसऱ्यांदा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. ठरावांची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नेत्यांनी आडाखे बांधण्यास सुरवात केली. असून राजकीय नेत्यांची जिल्हा बँक निवडणूक घाई सुरू झाली.

राज्यातील अनेक बँकेच्या मुदती संपल्या असून जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची मुदत मे २०२० मध्ये संपली आहे. यामुळे सध्या बँकेवर प्रशासक आहे. यापूर्वी दोनदा निवडणूक प्रक्रिया रद्द करावी लागली होती. या दरम्यान गावांच्या विविध कार्यकारी सोसायटीसह इतर संस्थांचेही अर्थकारण व राजकारण बदलले. लांबलेल्या निवडणुकीसाठी संस्था सभासदांचे ठराव मार्च महिन्यात मागविण्याचा कार्यक्रम विभागीय सहनिबंधकांनी जाहीर केला. सहकारी संस्थांमध्ये मतदानाच्या ठरावाची प्रक्रिया गतिमान झाली असून. अनेक ठरावही जमा झाले आहेत. आता पुन्हा ही प्रक्रिया पुढे सलगपणे राबवली जाणार आहे.

अजून काही संस्थाचे ठराव येणे बाकी असून , त्यांना संधी मिळेल की नाही किंवा ठरावासाठी अजून वेगळे निकष लावले जातील का याबाबत मात्र सहकार विभागाच्या सूचनेनंतर चित्र स्पष्ट होणार आहे. निवडणूक कार्यक्रमाची तयारी सुरू झाल्याने इच्छुकांसह मतदार देखील आत्तापासूनच तयारीला लागले असल्याने पुन्हा एकदा थंडावलेले जिल्ह्याचे राजकारण तापणार हे मात्र नक्की आहे. गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या नेत्यांना आता मात्र पायाला भिंगरी लावून मतदारांच्या भेटी घ्याव्या लागणार आहेत.

नाशिक जिल्हा बँकेच्या संचालकपदासाठी 21 जागा आहेत. यात विविध कार्यकारी संस्था (सोसायटी) गटांतून प्रत्येकी एक याप्रमाणे 15 तालुक्याचे प्रतिनिधी. हौसिंग सोसायटी, नागरी बँका, बिगरशेती पतसंस्था, कर्मचारी पतसंस्था, मजूर संस्था, खरेदी- विक्री संघ, दूध संघ, वैयक्तिक सभासद, कुक्कुटपालन व इतर संस्था याचा प्रत्येकी 1 प्रतिनिधी, तसेच राखीव गटातून 5 प्रतिनिधी निवडून येत असतात. यात महिला प्रतिनिधीकरिता 2, अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीतील सदस्य १, विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागासवर्गातील सदस्य 1, इतर मागासवर्गातील सदस्य (OBC) 1 जागा असते.

सोसायटी गट आर्थिक उलाढालीत लक्षवेधी

जिल्हा बँकेसाठी 1 हजार 46 विविध कार्यकारी संस्था सोसायट्या, पात्र इतर संस्था, तसेच वैयक्तिक सभासद असून 10 हजारांच्या आसपास संस्था मतदानास पात्र राहु शकतात. मतदानासाठी संस्थेच्या प्रतिनिधीचा ठराव केले की तेच मतदार असतात.सोसायटी गटातून प्रत्येक तालुक्यातून एक संचालक पाठविला जातो,त्यांना तालुक्यातील मतदारांचे मते असल्याने सोसायटी गटासह इतर गटातून मते मिळतील अशा जवळच्या व्यक्तीचे ठराव फिल्डिंग लावून  केले गेले आहे. आता पुन्हा सोसायटीवर सत्ता असलेल्या पॅनल प्रमुखासह संचालकांना व ठराव केलेल्या प्रतिनिधीला विश्वासात घेऊन इच्छूक नेते आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

जिल्हा बँक चौकशीच्या फेऱ्यात…

जिल्हा बँकतील गैरव्यवहारांमुळे तत्कालीन संचालक मंडळ संशयाच्या फेऱ्यात असल्याने, निवडणुकीत हा मुद्दा देखील गाजण्याची शक्यता आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here