क्लायमेट ॲक्शन प्लॅन सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

0
31

नाशिक प्रतिनिधी : नाशिकचे हवामान पोषक राहण्यासाठी महानगरपालिका आणि वर्ल्ड रिर्सोस इन्सिट्यूट यांच्यामध्ये नाशिक क्लायमेट ॲक्शन प्लॅनच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. तसेच शहरांचा विकास आराखडा करताना स्थानिक नागरिक, तज्ज्ञ व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग घेतला तर निसर्गाची कमीत कमी हानी करून पर्यावरण पूरक शाश्वत विकास साधण्यात यावा , असे आवाहन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

बोट क्लब येथे आयोजित नाशिक जिह्याची पर्यटन विषयक आढावा बैठकीत आदित्य ठाकरे यांनी विशेष मुद्दे अधोरेखित केले. त्यावेळी नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पर्यटन संचालनालय मुंबईचे संचालक मिलिंद बोरीकर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण, महानगरपालिका उपायुक्त मनोज घोडे –पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, महानगरपालिकेचे इतर अधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली.

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘शुद्ध हवा आणि पाणी तसेच नागरिकांना चांगले जीवन देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन पर्यावरण पूरक विकासाची कास धरणे अत्यावश्यक आहे. तसेच महानगरपालिकेमार्फत सौरऊर्जा हा चांगला प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाची नागरिकांना माहिती दिल्यास शहरातील विजेचा मोठा प्रश्न सुटणार. जिल्ह्यातील महापालिकेमार्फत जीआयएस मॅपिंग करुन जिल्ह्यातील सर्व झाडांची त्यांच्या माहिती आणि त्यांच्या प्रकारासह मॅपिंगमध्ये समावेश करण्यात यावा. जेणेकरून त्यांची नोंद घेणे सोयीचे होणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील जमिनीखालील पाईपलाईन व सांडपाण्याचे गटार यांचेही परीक्षण करून या बाबींचा समावेश देखील या मॅपिंग मध्ये करावा जेणेकरून नवीन विकास आराखडा तयार करतांना नोंदी उपलब्ध होतील’.

शहरीकरण करताना पर्यावरण आणि निसर्गाच्या बाबतीत कोणतीही तडजोड होणार नाही. राज्यात पर्यटनाचा विकास होत आहे हा विकास करतांना सर्वांनी एकत्र येवून काम केल्यास पर्यावरणाचा समतोल साधता येईल आणि यासाठी नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सर्वोत्तपरीने मदत करण्यात येईल, असे प्रतिपादन नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. यावेळी ते म्हणाले की, ग्लोबल वार्मिंग व वातावरणीय बदलांचा अभ्यास करून विकासाचा आराखडा तयार करून शहरीकरणाचा विकास करणे आवश्यक आहे. विकासात्मक शहरीकरणाचा आराखडा तयार करतांना मूलभूत सोई सुविधांचा विचार आणि पर्यावरणाचा आराखडा तयार करावा.

महानगरपालिकेने सुरक्षित व सुंदर शहर निर्मितीसाठी स्पर्धेचे आयोजन केल्यास जलद गतीने जिल्ह्याचा विकास होईल. शहरीकरण करतांना झाडांचे नुकसान होणार नाही याची महापालिकेने काळजी घ्यावी, असेही नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव यांनी यावेळी नाशिक शहराच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here