प्रतिनिधी, नाशिक: करोनाची चौथ्या लाटेतील रोजच वाढणारी रुग्णसंख्या, डेंग्यू रुग्णांमध्ये होणारी चिंताजनक वाढ आणि त्यातच आता समोर आलेल्या स्वाइन फ्ल्यूच्या रुग्णांमुळे नाशिककरांवर तिहेरी संकट घोंगावत आहे. तब्बल दीड वर्षांनंतर नाशिककमध्ये स्वाइन फ्ल्यूने डोके वर काढले आहे. पाथर्डी शिवारातील पिता-पुत्राला या फ्ल्यूची लागण झाल्याचे समोर आले आहे. यातील एकाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. महापालिकेचा वैद्यकीय विभाग सतर्क झाला असून, या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचीही आरोग्य तपासणी केली जात आहे.
गेल्या अडीच वर्षांपासून नाशिककर करोना संकटाचा सामना करीत आहेत. शहरात गेल्या अडीच वर्षांतील करोना बाधितांचा आकडा २ लाख ७३ हजार ३७५ तर मृतांचा एकूण आकडा सरकारी नोंदीनुसार ४ हजार १०५च्या वर गेला आहे. तिसऱ्या लाटेनंतर दोन महिने स्वस्थ बसलेला करोना पुन्हा एकदा वाढू लागला आहे. ही वाढती आकडेवारी चौथ्या लाटेच्या दिशेने जात आहे. बुधवारी (दि. २९) एकाच दिवशी करोनाचे नवे ४८ रुग्ण आढळले असून, शहरातील उपचार घेत असलेल्या करोना बाधितांचा आकडा १८९ वर गेला आहे. तर करोना पाठोपाठो डेंग्यूनेही शहरात डोक वर काढले आहे. जून महिन्यात डेंग्यूचे १० रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नाशिककरांवर करोना आणि डेंग्यूचे संकट असतांनाच आता स्वाइन फ्ल्यूनेदेखील डोके वर काढले आहे.
पाथर्डी फाटा परिसरात ही दोन रुग्ण आढळली आहेत. त्यातील ३४ वर्षीय व्यक्तीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या रुग्णाविषयी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पालिकेच्या वैद्यकीय पथकाने रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी केली. या तपासणीत रुग्णाच्या ६४ वर्षीय वडिलांनादेखील फ्ल्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांना गृह विलगीकरणातच ठेवण्यात आले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम